Chhagan Bhujbal On Ajit Pawar: छगन भुजबळ गळ्यात 'अजितपर्व'चं आयडी घालून आले, दोन तासांत माघारी परतले; दादांचा प्रश्न विचारताच एका शब्दात उत्तर दिले!
Chhagan Bhujbal: दोन दिवसाच्या अधिवेशनाला हजेरी लावून छगन भुजबळ आता माघारी निघाले आहेत.
Chhagan Bhujbal NCP Adhiveshan: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन दिवसीय शिबिर (NCP Adhiveshan Ajit Pawar Group) आयोजित करण्यात आले आहे. शिर्डीत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी देखील हजेरी लावली. छगन भुजबळांच्या उपस्थितीमुळे त्यांची नाराजी दूर करण्यात पक्षाला यश आल्याचं बोललं जात होतं. परंतु छगन भुजबळांनी आपली नाराजी कायम असल्याचं आपल्या देहबोलीतून दाखवून दिलं आहे.
दोन दिवसाच्या अधिवेशनाला हजेरी लावून छगन भुजबळ आता माघारी निघाले आहेत. साधारणतः दोन तास छगन भुजबळ अधिवेशन स्थळी होते. गळ्यात अजितपर्वचं आयडी घालून छगन भुजबळ अधिवेशन स्थळी दाखल झाले होते. राष्ट्रवादीच्या अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक मंत्री, नेत्यांना हे आयडी देण्यात आले होते. यात अजित पवार यांच्याशी संवाद झाला असे विचारले असता त्यांनी "नाही" असे एका शब्दात उत्तर दिले. छगन भुजबळ अधिवेशनाला आले असले तरी प्रफुल्ल पटेल दोन तास घरी येऊन बसले म्हणून आलो. सुनील तटकरेंनी विनंती केली म्हणून आलो, असे उत्तर देत भुजबळ यांनी आपली नाराजी कायम असल्याचाच आपल्या देहबोलीतून दाखवून दिलं आहे. तसेच मी श्रद्धेनं वागलो. मात्र मला आश्रद्धेने वागणूक दिली, अशी खंतही छगन भुजबळांनी बोलून दाखविली.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल काय म्हणाले?
आमची दिशा काय राहिल..आमची विचारधारा राहिली पाहिजे, याबाबत अधिवेशनात चर्चा होईल. पुढच्या निवडणुका आहेत तिथे महायुती म्हणून निवडणुक लढू...काही छोट्या निवडणुकांमध्ये तेथील भावना जाणून लढता येईल..काही तडजोडी कराव्या लागतात. पुढचे पाच वर्ष महायुती टिकवायची आहे, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. तसेच प्रफुल्ल पटेल यांनी छगन भुजबळांच्या नाराजीवरही भाष्य केलं. माझी आणि भुजबळ यांची भेट झाली. तो आमचा कौटूंबिक प्रश्न आहे. टोकाची नाराजी नाही , निश्चित ते पक्षाचे आधारस्तंभ आहेत. त्यांचं मार्गदर्शन पक्षाला गरजेचे आहे. आम्ही परिवार म्हणून सोबत आहोत, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले. दिल्ली निवडणुकीत नवीन सरकार येईल. भाजपा तेथे चांगली कामगीरी करेल, असं राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज-
डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नाही आणि त्यामुळे ते नाराज होऊन नाशिकला निघून गेल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमाला छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली नव्हती. किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि छगन भुजबळ यांचा संवाद देखील होऊ शकला नव्हता.
अधिवेशनासाठी राज्यभरातील 500 पदाधिकारी निमंत्रित-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिर्डी येथे अधिवेशन पार पडत आहे. या अधिवेशनासाठी राज्यभरातील 500 पदाधिकारी निमंत्रित आहेत. शिर्डी येथील पुष्पक हॉटेल या ठिकाणी शिबिराची व्यवस्था करण्यात अली असून या संपूर्ण परिसराला यशवंतराव चव्हाण नगरी असं नामकरण करण्यात आलं आहे. शिबिराचा ठिकाणी भव्य स्टेज तयार करण्यात आलं असून अजित पवारांची आकर्षक रांगोळी देखील काढण्यात आली आहे.