(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यपालांवर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते?; हायकोर्टाचा सवाल
Maharashtra Governor : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्याबाबत जनहित याचिका कशी होऊ शकते? राज्यपालांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकते का? हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना सवाल
Maharashtra Governor : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्यावर महाभियोगाची कारवाई करण्यात यावी यासाठी जनहित याचिका कशी होऊ शकते? तसेच राज्यपालांना कोणतंही वक्तव्य करण्यापासून रोखलं जाऊ शकतं का? असे थेट प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) गुरुवारी (1 डिसेंबर) याचिककर्त्यांना केले. कांदिवलीतील रहिवासी दीपक जगदेव यांनी वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत ही याचिका हायकोर्टात दाखल केली आहे. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर वकील नितीन सातपुते यांनी ही याचिका गुरुवारी सादर केली.
महाराष्ट्रासाठी पूजनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांचा अवमान करणारी वक्तव्य करण्यापासून राज्यपालांना रोखण्याची मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. त्यावर राज्यपालांना अशी वक्तव्य करण्यापासून रोखण्याचा अधिकार न्यायालयाला आहे का? अशी विचारणा मुख्य न्यायमूर्तींनी याचिकाकर्त्यांना केली. तसेच एवढ्यावरच न थांबता हा मुद्दा जनहित याचिकेद्वारे उपस्थित करता येऊ शकतो का?, मुळात ही याचिका जनहित याचिकाच कशी होऊ शकते? असा प्रश्न उपस्थित करत या याचिकेवर तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला.
काय आहे याचिका?
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी पदभार स्वीकारल्यापासून नेहमीच वादग्रस्त वक्तव्ये आणि आपल्या निर्णयांबाबत चर्चेत रहिले आहेत. त्यांनी नुकतच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. यापूर्वीही त्यांनी सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले आदी नेत्यासह महाराष्ट्रासंदर्भातही वादग्रस्त वक्तव्य करुन महापुरुषांचा अवमान केल्याचा आरोप झाला आहे. या वादग्रस्त वक्तव्यांनामुळे राज्यपालांन राज्याच्या जनतेतील एकोपा आणि शांतता बिघडवली असा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 61आणि 156 अंतर्गत महाभियोगाची कार्यवाही करावी. तसेच पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना करुन महाराष्ट्रात दंगलीसदृश परिस्थिती निर्माण करण्यासाठी लोकांना चिथावणी खोर वक्तव्य केल्याप्रकरणी कलम 153, 124 (अ) अन्वये फौजदारी कारवाई करुन त्या आदेशाची प्रत लोकसभा आणि राज्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना द्यावी अशी विनंती याचिकेत केली आहे.
राज्यपाल काय म्हणाले होते?
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राज्यातील वातावरण तापलं आहे. राज्यपाल बोलताना म्हणाले होते की, आम्ही शाळेत असताना आम्हाला शिक्षक विचारत होते की, तुमचा आवडता हिरो कोण आहे. त्यामुळे कोणाला सुभाषचंद्र भोस, कोणाला महात्मा गांधी, पंडीत जवाहरलाल नेहरु आवडायचे. त्यामुळे मला असे वाटते की, तुम्हाला जर कोणी विचारले तुमचे आवडत हिरो कोण आहे. तर तुम्हाला बाहेर जाण्याची गरज नाही. कारण तुम्हाला महाराष्ट्रातचं ते सापडून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या युगाची गोष्ट आहे, मी नवीन युगाची गोष्ट सांगतोय असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. नितीन गडकरीपर्यंत तुम्हाला इथेच भेटून जातील असेही कोश्यारी म्हणाले.