(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Prithviraj Chavan: भाजपला बहुमत मिळणेही अवघड, इंडिया आघाडीला 240 जागा; पृथ्वीराज चव्हाणांचं भाकीत
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांचं भाकीत. भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड होईल. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 30 ते 35 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
मुंबई: देशातील लोकसभा निवडणूक ही लोकांनी हातात घेतली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपला बहुमताचा आकडा गाठणेही अवघड दिसत आहे. परिणामी केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता असल्याचे भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी वर्तविले. ते सोमवारी 'लोकसत्ता' दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना देशात भाजपविरोधी (BJP) वातावरण पाहायला मिळत असल्याचे म्हटले.
विविध राज्यांमधून आढावा घेतल्यानंतर भाजपला पुन्हा सत्ता मिळणे अवघड असल्याचे दिसत आहे. देश आणि राज्यात भाजपविरोधी वातावरण दिसत आहे. परिणामी गेल्या दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सहजपणे सत्ता स्थापन करणाऱ्या भाजपला सध्या बहुमताचा 272 चा आकडा गाठणेही अवघड दिसत असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
महाराष्ट्रात काय होणार?
देशात जी परिस्थिती आहे, तीच स्थिती महाराष्ट्रातही आहे. महाराष्ट्रात महायुतीचा घटक असलेल्या अजित पवार गटाची लोकसभेची एकही जागा निवडून येणार नाही. शिंदे गटाच्या तीन-चार जागा निवडून येऊ शकतात. तर काँग्रेसला 12 जागांवर यश मिळू शकते. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने लोकांची सहानुभूती आहे. त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज पृथ्वीराज चव्हाण यांनी वर्तविला.
देशभरात इंडिया आघाडी 240 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा अंदाज
गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती होती. त्यामुळे या दोघांनी सहा टक्के मते घेतली. परंतु, यंदा एमआयएमची साथ नसल्याने वंचितला पूर्वीइतकी मतं मिळणार नाहीत. तर देशपातळीवर इंडिया आघाडीलाही चांगले यश मिळेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. इंडिया आघाडीला देशभरात साधारण 240 ते 260 जागा मिळतील. याउलट 2019 च्या तुलनेत एकाही राज्यात भाजपच्या जागा वाढतील, असे दिसत नाही. 'अबकी बार चारसो पार' ही स्वत:चीच घोषणा पंतप्रधान मोदींच्या अंगलट आल्याची टिप्पणीही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.
यंदाच्या निवडणुकीत बेरोजगारी, भ्रष्टाचार, संविधान बचाव हे मुद्दे प्रभावी ठरत आहे. या मुद्द्यांवर मोदी आणि भाजपला स्पष्टीकरण देता आलेले नाही. भाजपकडून 2047 सालच्या विकसित भारताची संकल्पना मांडण्यात आली आहे. मात्र, त्याविषयी भाजपकडे स्पष्टता किंवा कोणतेही ठोस धोरण नसल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले.
आणखी वाचा
Exclusive ... तर पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना फुटली नसती, अमित शाह यांची सडेतोड मुलाखत