गुजरातमध्ये भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा 'आप'ला छुपा पाठिंबा, केजरीवाल यांचा दावा
Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन आम आदमी पक्ष गुजरातमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे.
Gujarat Assembly Election 2022: गुजरात विधानसभेच्या निवडणुका या वर्षाच्या अखेरीस जाहीर होण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेऊन आम आदमी पक्ष गुजरातमध्ये चांगलाच सक्रिय झाला आहे. यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी दावा केला की, गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे (BJP) अनेक नेते आणि कार्यकर्ते त्यांच्या आम आदमी पक्षाला छुप्या पद्धतीने पाठिंबा देत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणूक त्यांच्याच पक्षाकडून लढवू इच्छित आहेत. गुजरातमधील वलसाड येथील एका सभेला संबोधित करताना त्यांनी हा दावा केला आहे.
यावेळी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत की, "भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते मला गुप्तपणे भेटतात आणि सत्ताधारी पक्षाचा पराभव करण्यासाठी काहीतरी करायला सांगतात.'' ते म्हणाले की, “आपल्याला त्यांचा (भाजप) 27 वर्षांचा अहंकार मोडून काढायचा आहे. मला माहित आहे की, तुमचे व्यवसाय आहेत. तुम्ही आमच्यात सामील झाल्यास ते तुमच्या व्यवसायाचे नुकसान करतील. तुम्ही तिथेच रहा, पण पक्षाचा पराभव करण्यासाठी छुप्या पद्धतीने काम करा. काँग्रेस कार्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाही, तुम्ही तुमचा पक्ष सोडून 'आप'मध्ये येऊ शकता. तुमचा पक्ष विसरा.''
केजरीवाल पुढे म्हणाले की, “नव्या गुजरातसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. पक्षाची पर्वा करू नका, गुजरातसाठी काम करा, देशासाठी काम करा. 'आप' नवीन वादळ, नवे राजकारण, नवे पक्ष, नवे चेहरे, नवीन कल्पना आणि नवी पहाट आणेल, असा दावा त्यांनी केला. भाजपवर हल्लाबोल करत केजरीवाल म्हणाले की, "जे देवाचा अपमान करतात त्यांना राक्षस म्हणतात. जे देवतांचा अपमान करतात त्यांना कंसाची मुले म्हणतात. प्राचीन काळी भुते काय करत असत? ते कोणत्याही गावात घुसायचे, गुंडगिरी करायचे, महिलांची छेडछाड करायचे आणि बलात्कार करायचे.''
ते म्हणाले आहेत की, जनतेला शांततेने जगात यावे, यासाठी आम्हाला या राक्षसांना संपवायचे आहे. देवांचा अपमान करणार्या भ्रष्ट गुंडांना संपवायचे आहे. महागाईने जगणे कठीण झाले आहे. प्रत्येक वस्तूच्या किमती वाढतात पण पगार वाढत नाही. गुजरातमध्ये आम आदमी पक्ष सत्तेवर आल्यास स्वच्छ प्रशासन देईल आणि भ्रष्टाचार संपवेल, असे आश्वासन केजरीवाल यांनी दिले. गुजरातमध्ये मोफत वीज, 15 लाख नोकऱ्या, बेरोजगारी भत्ता यासह पक्षाच्या आश्वासनांचा त्यांनी पुनरुच्चार केला.
इतर महत्वाच्या बातम्या:
Mulayam Singh Yadav Health Update : मुलायम सिंह यादव यांची प्रकृती चिंताजनक, रूग्णालयाची माहिती
National Games 2022 : 10 वर्षाच्या शौर्यजीतचं 'शौर्य', मल्लखांबावरील कसरतींचे पंतप्रधानही झाले फॅन