BJP on Raj Uddhav Alliance: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची पोस्ट अमित शाहांना टॅग केली, आशिष शेलार म्हणाले, 'संजय राऊतांची औकाद नाही'
Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे 5 जुलै रोजी मुंबईत हिंदी सक्तीविरोधात निघणाऱ्या मोर्चात एकत्र येणार आहेत. भाजपसाठी ठाकरे बंधूंचे एकत्र येणे डोकेदुखी

Raj Thackeray & Uddhav Thackeray: राज्यातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आहेत. हे दोघेही येत्या 5 जुलै रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या हिंदी सक्तीविरोधातील मोर्चात एकत्र सहभागी होणार आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शुक्रवारी सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करुन यासंदर्भातील घोषणा केली होती. यानंतर सत्ताधारी भाजपच्या (BJP) गोटातून प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजप आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या या एकत्र येण्यावर भाष्य केले आहे.
मोर्चा काढणे हा त्यांचा अधिकार आहे. मराठी माणसासमोरच्या भूमिका स्पष्ट आहेत. या राज्यात मराठीची सक्ती आहे. भाजपा मराठीसाठी कट्टर आहे, मराठीसाठी आग्रही आहे. भाजप आणि केंद्र सरकार यामुळेच मराठी भाषेला अभिजात दर्जा दर्जा मिळाला आहे. पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी आहे. कोणीही गैरसमज अनावधानाने किंवा प्रयत्नपूर्वक पसरवू नये. जे सत्य आहे ते लोकांसमोर मांडावे. मराठी भाषा अनिवार्य आहे, हिंदी भाषा ऐच्छिक आहे, असे आशिष शेलार यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्या मोर्चाला मुंबई पोलिसांनी परवानगी देऊ नये, अशी मागणी केली होती. यावर संजय राऊतांनी टीका केली होती. गुणरत्न सदावर्ते हा देवेंद्र फडणवीसांचा पाळीव पोपट आहे, असे राऊत यांनी म्हटले होते. यावर आशिष शेलार यांनीही भाष्य केले. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर प्रतिक्रिया मी प्रतिक्रिया देणार नाही. आमचा कुठलाही हेतू नाहीये, असा विचार डोक्यात नाही. प्रत्येकाला लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. अंतिमतः निर्णय पोलीस घेतील. चर्चेला आम्ही तयार आहोत, गैरसमजाचे बळी पडू नका, असा सल्ला आशिष शेलार यांनी दिला.
2022 ला राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार त्रिभाषा धोरणाच्या अंमलबजावणीची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झालेली आहे आणि त्यातला हिंदी भाषेबाबतचा आयोगाच्या तज्ञांचा रिपोर्ट उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आलेला आहे. राज ठाकरे यांच्या पक्षालाही आमचे म्हणणे आहे की, काँग्रेसने यावर निर्णय घेतलेला आहे. त्यावेळच्या काँग्रेसच्या या निर्णयाला शरद पवारांनी पाठिंबा दिला होता, याकडे आशिष शेलार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
Sanjay Raut: संजय राऊत यांनी अमित शाहांना पोस्ट टॅग का केली?
संजय राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढण्याबाबत पहिले मराठीत ट्विट केले होते. त्यानंतर लगेच संजय राऊतांनी इंग्रजीत दुसरे ट्विट करत थेट केंद्रीय मंत्री अमित शाह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले. जय महाराष्ट्र म्हणत, महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीच्या विरोधात एकच आणि एकत्रित मोर्चा निघेल. ठाकरे हे ब्रँड आहेत, असे संजय राऊत यांनी पोस्टमध्ये म्हटले होते.
आणखी वाचा























