Raj Thackeray and Uddhav Thackeray : राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येण्याची घोषणा होताच भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून...'
Raj Thackeray and Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी घोषणा खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Raj Thackeray and Uddhav Thackeray : हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा मोर्चा 5 जुलैला तर 7 तारखेला ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) होणार होता. ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरु होत्या. यानंतर आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदीसक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदीसक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचे निश्चित झाले आहे. आता यावर भाजपची (BJP) पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
भाजप आमदार प्रसाद लाड यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे की, हिंदीची सक्ती केलेली नाही. मुख्यमंत्र्यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलेले आहे की, हिंदी भाषा सक्तीची नाही. त्यामुळे मराठी माणसाची दिशाभूल करण्याचे काम ठाकरे करत आहेत. मराठीचा पुळका उद्धव ठाकरेंना ते ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी आलेला दिसला नाही. त्यावेळी हिरव्यांच्या खाली लोटांगण घालण्याचे काम हे करत होते. ज्यांनी मुंबईवर हल्ले केले, त्यांच्या कबरी सजवण्याचे काम हे करत होते. त्यावेळी यांचे मराठी प्रेम कुठे गेले होते? 25 वर्ष मराठी माणसाने तुम्हाला महापालिकेत सत्ता दिली. त्या महापालिकेत भ्रष्टाचाराच्या पलीकडे कुठलेही काम केले नाही. त्यावेळी उद्धव ठाकरेंचे मराठी प्रेम कुठे गेले होते? असे म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून...
प्रसाद लाड पुढे म्हणाले की, मराठी भाषेला आम्ही बोट देखील लावायला देणार नाही. हा आमच्या महायुती सरकारचा शब्द आहे. त्यामुळे ठाकरे ज्या पद्धतीच्या बाता मारत आहेत, या भुलथापा आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मराठी माणसाला गाफील करून त्यांना फसवण्याचे काम करत आहेत. मराठी माणसाच्या मागे देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे उभे आहे, असेही त्यांनी म्हटले.
राज ठाकरेंच्या जीवावर पुढची निवडणूक लढवायचीय
संजय राऊत यांच्या ट्विटबाबत विचारले असता, प्रसाद लाड म्हणाले की, त्यांना ट्विट करावं लागतं, जेणेकरून ते दिवसभर बातमीत राहतील. संजय राऊत काय ट्विट करतात त्याला अजूनपर्यंत कधीही मनसे प्रमुख आणि मनसेच्या नेत्यांनी उत्तर दिलेले नाही. उत्तर दिले तरी संदीप देशपांडे यांनी त्यांच्या भाषेत उत्तर देण्याचे काम केले आहे. मनसेकडून अजूनपर्यंत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मला संजय राऊत यांना हेच विचारायचे आहे की, राऊत साहेब ज्या वेळेला तुम्ही सत्तेत होता, त्यावेळेस राज ठाकरे यांच्यासोबत तुम्ही एकत्र येणार का? असे आदित्य ठाकरे यांना विचारले होते. त्यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले होते की, ज्यांच्याकडे एक नगरसेवक नाही, त्यांच्याशी आम्ही काय चर्चा करायची? आज त्याच राज ठाकरेंचा तुम्हाला पुळका आलेला दिसतोय. आज त्याच राज ठाकरेंच्या पाया तुम्ही पडत आहात. राज ठाकरेंचा अनेक ठिकाणी अपमान करण्यात आला. आता तुम्हाला माहित आहे की, तुमच्याकडे लोक नाही, जनता नाही, मतदार नाही, नेते नाही. जे कोणी आहे ते सर्व सोडून चाललेले आहेत. त्यामुळे आता राज ठाकरेंच्या जीवावर पुढची निवडणूक लढवायची ही तुमची मानसिकता जनतेसमोर दिसून येत आहे. कोणी कोणाबरोबर युती करावी, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु आम्ही महायुती म्हणून एक आहोत, असे त्यांनी यावेळी म्हटले.
आणखी वाचा























