बारामतीचा तिढा संपला पण दिंडोरीत डोकेदुखी वाढली, भाजपचा बडा नेता बंडखोरी करणार, भारती पवार अडचणीत?
दिंडोरी मतदारसंघात भाजपची आणि महायुतीच्या उमेदवार भारती पवार यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक : सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Election) धूम आहे.उमेदवारी न मिळाल्यामुळे अनेक नेते बंड करण्याच्या भूमिकेत आहेत. असे अनेक बंड थोपवताना वेगवेगळ्या पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांची दमछाक होत आहे. नुकतेच बारामती (Baramati) लोकसभा मतदारसंघातील बंडखोरी शमवण्यात महायुतीला यश आले आहे. दरम्यान, एकीकडे बारामतीतील बंड थोपवण्यात यश आले असले तरी दिंडोरी या मतदारसंघामुळे (Dindori Constituency) आता महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. येते भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण (Harischandra Chavan) अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत.
हरिश्चंच्र चव्हाण अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात
भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून लढविणार निवडणूक लढविणार आहेत. ते अपक्ष म्हणून ही निवडणूक लढतील. भाजपने केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांना तिकीट दिले आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्या जोमात प्रचार करत आहेत. काहीही झालं तरी मीच जिंकणार, असा दावा त्यांच्याकडून केला जातोय. मात्र हरिश्चंद्र चव्हाण हे बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्यामुळे त्यांची डोकेदुखी वाढली आहे.
शरद पवारांकडून भास्कर भगरेंना तिकीट
याआधी भाजपकडून उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट झाल्यानंतर चव्हाण यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न केले होते. मात्र यात त्यांना अपयश आले. राष्ट्रवादीने येथून भास्कर भगरे यांना उमेदवारी दिली आहे. शेवटी पर्याय शिल्लक नसल्यामुळे हरिश्चंद्र चव्हाण हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात.
बंड थंड कसे करणार?
हरिश्चंद्र चव्हाण 2019 सालापर्यंत दिंडोरीचे खासदार होते. मात्र 2019 सालच्या निवडणुकीत त्यांना डावलून भारती पवार यांना तिकीट देण्यात आले होते. भारती पवार सध्या केंद्रात राज्यमंत्री आहेत. दरम्यान, चव्हाण हे बंडखोरी करून थेट निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी ठाम असल्यामुळे भारती पवार तसेच महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. चव्हाण यांचे बंड थंड करण्याचे महायुतीपुढे आव्हाण असणार आहे. त्यामुळे नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
माकप नाराज, लवकरच भूमिका जाहीर करणार
दुसरीकडे दिंडोरी लोकसभेची जगा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळाल्यामुळे इंडिया आघाडीचा भागा असलेल्या माकपने नाराजी व्यक्त केली आहे. दिंडोरीची जागा आम्हाला मिळावी, अशी मागणी माकपने केली होती. मात्र यात त्यांना यश आले नाही. माकपचे नेते तथा माजी आमदार जे पी गावित हे दिंडोरीसाठी उत्सुक होते. ते 31 मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊ आपली भूमिका मांडणार आहेत.