(Source: ECI/ABP News/ABP Majha)
भाजप पक्षातून हकालपट्टी केलेल्या माजी आमदाराचा थेट इशारा; रामटेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार?
रामटेकमध्ये महायुती शिवसेनेचे उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात बंडखोरी करण्याचा स्पष्ट निर्धार माजी आमदार आणि भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन रेड्डी यांनी केला आहे.
नागपूर : रामटेकमध्ये महायुतीचे (Mahayuti) आणि शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार आशिष जयस्वाल यांच्या विरोधात बंडखोरी करण्याचा स्पष्ट निर्धार माजी आमदार आणि भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आलेल्या मल्लिकार्जुन रेड्डी (Mallikarjuna Reddy) यांनी केला आहे. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आज रामटेकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांना पाडण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
आम्ही भाजपचेच कार्यकर्ते आहोत आणि भाजपमध्येच राहणार. आम्ही निवडणुकीत कुठल्याही दुसऱ्या पक्षाचे काम करणार नाही. मात्र आशिष जयस्वाल यांना रामटेकमधून विजयी होऊ देणार नाही, असा निर्धार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत केलाय. रामटेकमधील इतर पक्षाच्या आणि आशिष जयस्वाल यांच्यामुळे त्रस्त असलेल्या कार्यकर्त्यांनीही आम्हाला साथ द्यावी, असे आवाहनही यावेळी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्याकडून करण्यात आले आहे. त्यामुळे रामटेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रामटेक मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार?
रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामटेक विधानसभा मतदारसंघ अंतर्गत पारशिवनीमध्ये विकासकामांचे भूमिपूजन करताना आशिष जयस्वाल यांची उमेदवारी जाहीर केली होती. तेव्हापासूनच रामटेकमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मल्लिकार्जुन रेड्डी यांनी आशिष जयस्वाल यांच्या उमेदवारीचा विरोध करताना आपल्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांवरही आशिष जयस्वाल यांना अवाजवी साथ दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यानंतर महाराष्ट्र भाजपने मल्लिकार्जुन रेड्डी यांना तडकाफडकीने सहा वर्षासाठी पक्षातून निलंबित केले होते. निलंबनानंतरही आज मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यामध्ये कोणत्याही स्थितीत आशिष जयस्वाल यांना विजयी होऊ देणार नाही, असा निर्धार कार्यकर्त्यांसोबत व्यक्त केला.
आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही
भाजपचे माजी आमदार मालिकार्जून रेड्डी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. वारंवार पक्षाची शिस्त मोडून पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय.भाजपमधून सहा वर्षासाठी निलंबन झालेल्या माजी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांनी पक्षाला इशारा देत "आता रामबाण निघाला आहे, आता तो थांबणार नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालातून हे स्पष्ट होईल", असं म्हणत मल्लिकार्जुन रेड्डी यांनी रामटेकमधून बंडखोरी करणार असल्याची भूमिका व्यक्त केली आहे. पक्षाने त्यांना सहा वर्षासाठी निलंबित केले ही माहिती समजल्यानंतर काही कार्यकर्ते व स्थानिक पत्रकार जेव्हा मल्लिकार्जुन रेड्डी यांना भेटायला गेले, तेव्हा त्यांनी मी "कोणत्याही स्थितीत कॉम्प्रमाइज करणार नाही, मी कॉम्प्रमाईज करणारा नाही" अशी भूमिका व्यक्त केली. 20 वर्षांपासून आशिष जैस्वाल कोणाची तरी मदत घेऊन निवडणूक जिंकत आला आहे, त्याच्यामुळे रामटेकमध्ये भाजप संपत चालली आहे, असा आरोपही मल्लिकार्जुन रेड्डी यांनी यावेळी केला.
हे ही वाचा