![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
Bhiwandi Lok Sabha Election : भिवंडी बोगस मतदान होत असल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी केला तर कपिल पाटील हे मतदारांना धमकावत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला.
![Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप Bhiwandi Lok Sabha Election Bogus voting intimidation of voters allegations Kapil Patil vs suresh Balyamama Mhatre elections marathi Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/20/b15c751744cd92716e9420c0920fef27171622778202793_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
ठाणे: राज्यातल्या पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली तरी राजकीय आरोप प्रत्यारोप मात्र सुरूच असल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून बोगस मतदान केलं गेल्याचा आरोप कपिल पाटील यांनी केला. तर कपिल पाटील हे मतदारांना धमकवत असल्याचा प्रत्यारोप बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला.
सोमवारी सायंकाळच्या सुमारास केंद्रीय मंत्री आणि महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांना मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर कपिल पाटील मतदान केंद्रावर दाखल झाले आणि त्या ठिकाणी लोकांची गर्दी पाहून त्यांनी गर्दी कमी करण्यास सांगितलं. निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्याशी हुज्जत घालत त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केल्याची चर्चा आहे.या संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
बोगस मतदान होत असल्याचा कपिल पाटलांचा आरोप
भिवंडी शहरामध्ये सकाळपासून शांततेत सुरू असलेल्या मतदानात सायंकाळी काही ठिकाणी वादंग होत गालबोट लागलं. खंडूपाडा बाला कंपाउंड मिलत नगर येथील अल्पसंख्यांकबहुल असल्या मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी भाजपा उमेदवार कपिल पाटील यांच्याकडे आल्या. त्यानंतर ते स्वतः या मतदान केंद्रांवर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक अधिकारी तसेच पोलीस यंत्रणा यांना धारेवर धरत मतदान केंद्र परिसरात उभे असलेल्या नागरिकांच्या घोळक्याला बाहेर हाकलून लावण्याची मागणी केली.
पोलिसांनी या भागातील मतदान केंद्रावरील गर्दी बाजूला केली. या वेळी अनेक मतदान केंद्रावर बोगस मतदान होत असल्याच्या तक्रारी कपिल पाटील यांनी केल्या. काही ठिकाणी बोटावरील शाई पुसण्यासाठी केमिकल घेऊन बसल्याचे दिसून आल्याचा आरोप करत लोकशाही वाचवायला निघालेलेच लोकशाहीची हत्या करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
कपिल पाटलांनी मतदारांना धमकावलं, म्हात्रेंचा आरोप
सकाळपासून मतदारांनी मतदानासाठी दाखवलेला उत्साह ही विजयाची नांदी असून कपिल पाटील यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचा टोला सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला. विरोधकांनी आपला पराभव मान्य केला आहे त्यामुळे त्याचे खोटे आरोप करून मतदान प्रक्रिया जाणून-बुजून बंद पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले. ज्यांनी आयुष्यभर सर्वसामान्यांना धमकावलं त्यांनीच खऱ्या अर्थाने लोकशाहीची हत्या केली असून आम्ही संविधान वाचवण्यासाठी लढत असल्याचं प्रत्युत्तर महाविकास आघाडीचे सुरेश बाळ्यामामा म्हात्रे यांनी दिलं.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)