(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मोठी बातमी : अजितदादांना फोन केल्याचा दावा, बजरंग सोनवणे यांनी अमोल मिटकरींना एका वाक्यात सुनावलं!
Bajrang Sonwane News : बजरंग सोनवणे यांनी अजितदादांना फोन केल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मिटकरींना खडे बोल सुनावले आहेत.
मुंबई : अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात बीडचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' अशा आशयाचं ट्वीट आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र, या प्रकरणावर बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत, मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच राहणार, असं स्पष्ट केलं आहे.
बीडच्या बप्पाचा दादांना फोन
अमोल मिटकरी यांनी ट्वीट केल्यानंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी याबाबत एबीपी माझासोबत बोलताना सांगितलं आहे की, अमोल मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावं की, बजरंग सोनवणे शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार साहेबांच्या गटात येणार किंवा त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्यात येणार, हे जे काही मिटकरींनी ट्वीट केलं आहे. मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांसोबतच असणार आहे. असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार अमोल मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा.
मी मरेपर्यंत शरद पवार साहेबांसोबतच राहणार : बजरंग सोनवणे
'मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो. ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवं.ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहे. या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात, ते तुम्ही राजकारणात आणताय. हे मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिलंय, मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावं आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा, ही माझी विनंती आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार साहेबांसोबतच राहणार', असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी राजकीय वर्तुळातील चर्चांना पूर्णविराम दिला आहे.