Baramati Lok Sabha Election : बारामतीच्या हायव्होल्टेज लढतीत अजित पवारांना सर्वात मोठी धोबीपछाड, शरद पवारच बारामतीचे 'बॉस'
Baramati Lok Sabha Election Result 2024 : शरद पवार आणि अजित पवार यांच्यासाठी बारामतीची लढत ही प्रतिष्ठेची बनली होती. त्यामध्ये बारामतीकरांनी शरद पवारांना आपला कौल दिल्याचं दिसतंय.
मुंबई : बारामती कुणाची? मोठ्या साहेबांची की अजितदादांची? गेल्या काही दिवसांपासून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असून बारामतीकरांनी मुलीला म्हणजे सुप्रिया सुळेंना पसंती दिली आहे तर सुनेला म्हणजे सुनेत्रा पवारांना नाकारलं. राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेची लढाई ही सुप्रिया सुळेंनी जिंकली आहे. त्यामुळे बारामतीच्या अतितटीच्या लढाईत काकांनी पुतण्याला धोबीपछाड देत आपणच बारामतीचे 'बॉस' असल्याचा सिद्ध केलं. बारामतीतील पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का आहे.
मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार याच्यामध्ये चढाओढ सुरू असल्याचं दिसून आलं. पण शेवटच्या टप्प्यात सुप्रिया सुळे यांनी निर्णायक आघाडी घेतली आणि विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे गेल्या 60 वर्षांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागलेल्या शरद पवारांनी आपल्या लेकीला निवडून आणत बारामती आपलीच आहे हा संदेश दिला.
बारामतीमध्ये अतितटीची लढत
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार आणि शरद पवार यांचा पहिला सामना झाला तो त्यांच्या होमग्राऊंडवर, बारामतीमध्ये. अजित पवारांनी शरद पवारांशी थेट पंगा घेत, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचीच उमेदवारी जाहीर केली. अजित पवारांच्या या निर्णयाला त्यांच्या कुटुंबीयांनीही विरोध करत सुप्रिया सुळेंचा प्रचार केला.
पवार एकाकी लढते, अजितदादांना भाजपची रसद
बारामतीमध्ये पवारांना घेरण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. जे जे नेते अजित पवारांच्या विरोधात होते, त्या नेत्यांना भाजपने आपल्याकडे वळवून घेतलं आणि सुनेत्रा पवारांच्या प्रचारात सक्रिय केलं. हर्षवर्धन पाटील आणि विजय शिवतारेंनी सुनेत्रा पवारांचा प्रचार केला. त्याचवेळी स्थानिक पातळीवरील अनेक नेत्याना अजित अजित पवारांनी साम, दाम, दंड, भेद नितीने आपल्या बाजूने वळवून घेतलं.
तर दुसऱ्या बाजूला शरद पवार बारामतीमध्ये सक्रिय होऊन जुन्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या. त्यामध्ये त्यांनी अनंतराव थोपटे आणि चंद्रराव तावरे यांची भेट घेऊन राजकीय बेरीज केली. तसेच गावागावातल्या अनेक स्थानिक संस्थांच्या पदाधिकांच्या भेटी घेतल्या.
नव्या चिन्हासह शरद पवार निवडणुकीला सामोरे
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं, त्याचवेळी शरद पवारांचे अनेक विश्वासू नेते फोडून राष्ट्रवादीवर दावाही केला. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजितदादांना दिल्यानंतर शरद पवारांनी पुन्हा एकदा पक्षसंघटना उभी केली. तुतारी या चिन्हासह ते लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं गेले.
ही बातमी वाचा: