Baramati Lok Sabha: 'मी तुमची बारामती', मतदानादिवशी अनेक गैरप्रकार, शरद पवार गटाकडून गंभीर आरोप
"बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'बारामती' ने संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला हा पत्रप्रपंच!" या मथळ्याखाली पत्र लिहित टीका करण्यात आली आहे.
पुणे: बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) मतदानाच्या दिवशी अनेक गैरप्रकार घडल्याचा आरोप करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाने ट्विटरच्या माध्यमातून विरोधी पक्षावर टीका केली आहे. "बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'बारामती' ने संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला हा पत्रप्रपंच!" या मथळ्याखाली पत्र लिहित टीका करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने लिहिलेले पत्र जसेच्या तसे
नमस्कार,
मी तुमची बारामती. या राज्याची एक भगिनी, माझ्या लोकसभा मतदारसंघाने आजवर अनेक निवडणुका पाहिल्यात. राजकीय स्थित्यंतर पाहिलीत. पण काल जे घडलं ते माझ्यासाठी फार नवीन आणि वेदनादायी होतं. काल मी बारामती लोकसभा मतदारसंघात इथल्या प्रतिभावान राजकीय परंपरेला छेद जाताना पाहिलंय. आजवरच्या या लोकशाहीच्या उत्सवात सर्वजण मिळून मिसळून सहभागी व्हायचे. राजकीय मतभेद जरी असले तरी मतदान प्रक्रिया, निवडणूक प्रक्रिया ही शांततेत पार पडत असे. परंतु काल मात्र आदर्श आचारसंहिता ही बासनात गुंडाळण्याचं काम सत्ताधारी पक्षाकडून करण्यात आलं. भारताच्या इतिहासात आतापर्यंत कधीच कुठलीही सहकारी बँक रात्रभर सुरु नव्हती. पण मतदानाच्या आदल्या दिवशी माझ्या मतदारसंघातील वेल्हे इथली पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रात्रभर सुरु होती. ज्या बँकेवर सत्ताधारी पक्षाच्या नेत्याचं वर्चस्व आहे. पैशांनी भरलेल्या बॅगा, प्रचारपत्रके, मतदार यादी यासारखा बराच मुद्देमाल असलेली वाहने बारामती लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात खेडोपाड्यात फिरत होत्या. बंद खोल्यांमध्ये मतदानाच्या आदल्या रात्री कार्यकर्त्यांकडून पैशांचं वाटप सुरू होतं.
मतदान केंद्रावरही विरोधकांकडून दमदाटी सुरु होती. एक वेगळच चित्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळालं, जे आजवर कधीही निदर्शनास आलं नाही. अहो इतकंच काय सत्तारुढ रिक्षातील आमदारांकडून तर त्यांच्या विरोधातील कार्यकर्त्याला शिवीगाळ करण्यात आली. धाय मोकलून हा कार्यकर्ता रडत होता, अशी ही परिस्थिती। आतापर्यंत बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणुका या भयमुक्त होत्या. परंतु यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामती लोकसभा मतदारसंघात दडपशाही कारभार पाहायला मिळाला.
बारामती लोकसभा मतदारसंघात पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'बारामती' ने संपूर्ण महाराष्ट्रासाठी केलेला हा पत्रप्रपंच! pic.twitter.com/tyjYAJVv21
— Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar (@NCPspeaks) May 8, 2024
बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रिया ही संपूर्ण देशासाठी आजवर एक आदर्श होती. परंतु काही लोकांनी याठिकाणी पैशांचा पाट वाहून इथल्या सुसंस्कृत राजकीय परंपरेचा बिमोड करण्याचं काम केलं. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता सुजाण आहे. धनशक्तीला ही जनशक्ती भारी पडली. येत्या काही दिवसात आणखी निवडणुकीचे टप्पे पार पडणार आहेत. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील सुजाण जनतेचा हाच आदर्श येत्या काळात राज्यातील मतदार घेतील, हा विश्वास आहे. म्हणूनच हा सगळा पत्रप्रपंच
हे ही वाचा :