Ashish Shelar : मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण! वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल, आशिष शेलारांसह राज ठाकरेंची भूमिका
Maharashtra Politics : मनसेला युतीत सामील करण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाकडूनही विचारमंथन सुरु असल्याची मोठी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.
Ashish Shelar on Raj Thackeray : भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये भाजप आणि मनसे यांच्यातील युतीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे. आगामा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलं आहे. राज ठाकरे यांना महायुतीत सामील होण्यासाठी प्रस्ताव असल्याची चर्चा आहे. इतकंच काय तर मनसेला युतीत सामील करण्यासाठी दिल्लीतील नेतृत्वाकडूनही विचारमंथन सुरु असल्याची मोठी माहिती सुत्रांकडून समोर आली आहे. आशिष शेलार या भेटीनंतर भाजप-मनसे युतीबाबत प्रतिक्रिया दिली आहे.
मनसे-भाजप युतीच्या चर्चांना उधाण
आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांच्यासोबतच्या भेटीवर प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, साथ वगैरेचा काही सवाल नाही आम्ही राजकीय मित्र आहोत भेटत असतो. युतीबाबत चर्चा झाली का, या प्रश्नावर उत्तर देताना शेलार यांनी सांगितलं की, 'मन की चर्चा झाली, जन की बात' झाली. शेलार पुढे म्हणाले की, राजकरणात भेटीगाठी होत असतात, चर्चा होत असतात. अद्याप कोणताही राजकीय निर्णय नाही, योग्य वेळी याबाबत चित्र स्पष्ट होईल, असं आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. 'देवेंद्रजी म्हणाले आहेत तर, लवकरच चित्र स्पष्ट होईल. सध्या मी मनसेबद्दल काहीच बोलणार नाही, योग्य वेळी यावर निर्णय होईल', असं शेलार यांनी सांगितलं आहे.
मनसे-भाजप युतीबाबत राज ठाकरेंची भूमिका काय
दरम्यान, या मुद्द्यावर मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनीही अधिकच बोलणं टाळलं आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी सकारात्मक किंवा नकारात्मक अशी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. राज ठाकरे यांनी भाजपसोबत युतीच्या चर्चांवर मौन बाळगलं असून वेळ आल्यावर चित्र स्पष्ट होईल असं म्हटलं आहे. मात्र, राज ठाकरे यांनी युतीच्या चर्चा फेटाळल्याही नाहीत, त्यामुळे मनसे-भाजप युतीच्या चर्चांना वेग आला आहे.
'काँग्रेस, शिवसेनेचा अवस्था बिकट'
काँग्रेस नेत्यांच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया देताना शेला म्हणाले की, 'काँग्रेसची जी आजची अवस्था आहे, ती बिकट आहे. राज्यातील असो किंवा देशातील काँग्रेस असो मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे खासदार आणि लोक इकडे (भाजपमध्ये) येणार आहेत. पुढच्या काळात आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकटेच राहतील'
शेलारांचा आदित्य ठाकरेंवर निशाणा
आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंवरही निशाणा साधला आहे. यावेळी ते म्हणाले की, 'आपलं बळ आहे तेवढंच बोलावं. ते महाराष्ट्रात फिरत आहेत, त्यानं 'लख लाभो'. पण, आदित्यजी कुठे आहेत? वरळीत लोक त्यांचा दुर्बिण लावून शोधत आहेत. वरळीत इमारती बांधण्याचा प्रस्ताव उद्धवजींनी पास केलाय. लोक त्रस्त आहेत, लोकांवर अधिक बोजा आला आहे. कोळी समाजाचे लोक दोन पिलरमधल्या अंतराबाबत आदित्यजींच्या मागे लागले होते, शेवटी मुख्यमंत्री शिंदेनी प्रश्न सोडवला. अनेक प्रश्न वरळीत पडले आहेत, या सगळ्याकडे ना बघता ते गावभर फिरत आहेत आणि आदित्य ठाकरे निवडणुकीवर बोलत आहेत. आदित्यजी निवडणुकीची खुमखुम असेल तर, राजीनामा द्या आणि आमच्या महायुतीविरोधात लढा. आता वरळीत लाथ बसणार आहे, त्यामुळे ठाण्यात येतो-येतो करत आहेत', असं म्हणत शेलारांनी आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :