मोदींची थोरल्या पवारांवर टीका; देशमुख म्हणतात, अजितदादांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं
PM Modi Shirdi Visit : अजित पवारांनी उठून जायला हवं होतं किंवा मोदींचं वक्तव्य दुरुस्त करायला हवं होतं, त्यांनी मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती, त्यांनी काल मोदींना थांबवायला हवं होतं, असंही वक्तव्य अनिल देशमुखांनी केलं आहे.
Anil Deshmukh on PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर डागलेलं टीकास्त्र निवडणूक जवळ आल्यामुळे केलेलं असावं, अशी टीका अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केली आहे. तसेच, शरद पवारांवर ज्यावेळी मोदींनी (PM Modi) टीका केली, त्यावेळी त्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित होते याबाबत बोलताना अजित पवारांनी उठून जायला हवं होतं किंवा मोदींचं वक्तव्य दुरुस्त करायला हवं होतं, त्यांनी मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती, त्यांनी काल मोदींना थांबवायला हवं होतं, असंही वक्तव्य अनिल देशमुखांनी केलं आहे.
अजित पवारांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं : अनिल देशमुख
पंतप्रधान नरेंद्र मोदी काल (गुरुवारी) महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले. त्यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात मोदींची जाहीर जनसभा पार पडली. मोदींनी सभेत बोलताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मंचावरुन मोदींनी उपस्थित करत थोरल्या पवारांवर टीकास्त्र डागलं. महत्त्वाची बाब म्हणजे, यावेळी मंचावर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावर बोलताना राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुखांनी थेट अजित पवारांवर टीकास्त्र डागलं. ज्यावेळी मोदींनी शरद पवारांवर टीका केली, त्यावेळी अजित पवार यांनी मंचावरुन उठून जायला हवं होतं किंवा मोदींना दुरुस्त करायला हवं होतं, असं अनिल देशमुख म्हणाले.
निवडणूक जवळ आल्यानं मोदी असं बोलले : अनिल देशमुख
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख बोलताना म्हणाले की, "2013 मध्ये मोदींनी काही वर्तमानपत्रांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांच्या शेती आणि शेतकऱ्यांबद्दल कामाची स्तुती केली होती. शरद पवार यांच्या प्रयत्नांमुळे शेत पिकांच्या हमी भावामध्ये वाढ झाल्याचं मोदी त्या मुलाखतीत बोलले होते. तेव्हा शरद पवार यांना देवदूत म्हणणारे मोदी काल काय बोलले. निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे मोदी असं बोलत असावेत."
शरद पवारांच्या कृषी क्षेत्रातील कामांचा उल्लेख करत मोदींना आठवण
"मोदींना त्यांच्या जुन्या मुलाखतीची आठवण करून देण्याचा माझा प्रयत्न आहे. शरद पवार यांच्यामुळे अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला. 71 हजार कोटींची कर्ज माफी दिली. गोसेखुर्द प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता मिळवून दिली. हॉर्टीकल्चर मिशन राबवून फळ उत्पादनात स्वयंपूर्ण झाला.", असं अनिल देशमुख म्हणाले आहेत.
अजित पवारांनी मोदींना वस्तुस्थिती सांगायला हवी होती : अनिल देशमुख
अजित पवार यांनी काल उठून जायला हवं होतं किंवा मोदींचे वक्तव्य त्यांनी दुरूस्त करायला हवं होतं. अजित पवार यांनी वस्तुस्थिती सांगायला हवी होती. अजित पवार यांनी काल मोदींना थांबवायला हवं होतं, असं म्हणत अनिल देशमुखांनी अजित पवारांनाही खडे बोल सुनावले आहेत.
मोदींच्या शरद पवारांवरील टीकेवर अजित पवार गटाचं मौन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टीकेबाबत अजित पवार गटानं मौन बाळगलं आहे. मोदींच्या टीकेबाबत अजित पवार गटाकडून सावध पवित्रा घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या वक्तव्यावर अजित पवार गटातील नेत्यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शरद पवार गटाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीकेवर मात्र प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. शरद पवार गटाकडून मोदींना 2015 च्या बारामतीतील भाषणाची आठवण करून देणारं ट्वीट करण्यात आलं आहे.
ललित पाटीलला अटक करण्यास एवढा उशीर का? : अनिल देशमुख
अनिल देशमुखांनी ललित पाटील प्रकरणावरही भाष्य केलं आहे. अनिल देशमुख म्हणाले की, "ललित पाटील प्रकरणात सतरा लोकांना अटक झाली आहे. मात्र अटक करण्यामध्ये एवढा उशीर का? वर्तमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझा प्रश्न आहे. जेव्हा गुन्हेगाराला उपचारासाठी नेलं जातं, तेव्हा पोलीस बंदोबस्त तिथे असतो. मात्र, ललित पाटील प्रकरणांमध्ये असं का झालं नाही? एखादा गुन्हेगार नऊ-नऊ महिने उपचारासाठी रुग्णालयात कसा असतो? वरून दबाव आल्याशिवाय असं होऊ शकत नाही."