अमोल मिटकरी म्हणाले, दादा-ताई आषाढीपर्यंत एकत्र येतील; सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
हा काय माझा निर्णय नाही, कोण कुठे जाणार आहे? हा पक्षाचा निर्णय आहे. पवार साहेबांचे राजकारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे.

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राज्यात ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्याची जोरदार चर्चा सुरू असून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा जरा मागे पडली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येण्यावर राष्ट्रवादीचे मिटकरी यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. पांडुरंगाची ईच्छा असेल तर बहीण-भाऊ आषाढी एकादशीपर्यंतही एकत्र येऊ शकतात, असा गौप्यस्फोटच मिटकरी यांनी केला आहे. 10 तारखेला पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट बघा, मेळाव्यात मोठे संकेत मिळण्याचे सुतोवाच मिटकरींनी केले आहेत. आता मिटकरी यांच्या वक्तव्यावर आणि दोन राष्ट्रवादी एकत्र येण्यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya sule) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हा काय माझा निर्णय नाही, कोण कुठे जाणार आहे? हा पक्षाचा निर्णय आहे. पवार साहेबांचे राजकारण आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पवारसाहेब जो निर्णय घेत आहेत, तो लोकशाही मार्गाने घेत असतात. यासंदर्भात मी सगळ्यांशी चर्चा करेल, कार्यकर्त्यांच्या मनात काय आहे ते मला कळेल अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली. तसेच, आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्यावरही सुप्रिया सुळेंनी भूमिका स्पष्ट केली. अजित पवार आणि मी लहानपणापासून बहीण-भाऊ आहोत, मिटकरी यांची जी इच्छा आहे, त्याबद्दल मी आभारी आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले.
अमोल मिटकरींवर संतापले सुनील तटकरे
आमदार अमोल मिटकरींच्या वक्तव्यावरती प्रतिक्रिया देताना, सुनील तटकरे म्हणाले, राज्यातल्या जनतेने आता आमचा राष्ट्रवादीवर शिक्कामोर्तब केला आहे. राज्यात आम्ही आता एनडीएच्या सरकारमध्ये सहभागी आहोत. वेगळी राष्ट्रवादी करण्याचा निर्णय आता अधोरेखित आहे, त्यामुळे त्याच्यात जराही बदल होणार नाही. आम्ही घेतलेल्या भूमिकेत ज्यांना यायचे त्यांनी यावं, त्यामुळे एकत्र येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अमोल मिटकरी यांनी आता बोलताना जपून वक्तव्य करावं, असं म्हणत सुनील तटकरे अमोल मिटकरींवर संतापले. तर पक्षातील एखाद्या वरिष्ठांनी एकदा भूमिका मांडली की कोणी त्याच्यावर बोलण्याची गरज नाही असंही त्यांनी पुढे स्पष्टपणे सांगितलं आहे.
अंतिम निर्णय अजित दादा घेतील - मिटकरी
सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर आता अमोल मिटकरींनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ''सुप्रियाताईंनी आभार मानायचं काम नाही, कारण त्या खूप मोठया आहेत. दादा आणि ताईचं बहीण-भावाच नातं जन्मापासून आहे. दोन्ही पक्ष एकत्र असलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं, तशी भावना आहेत. मात्र, अंतिम निर्णय अजितदादा घेतील, त्यांचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च आहे, असे मिटकरी यांनी म्हटले.























