Video: सुरेश धसांचा CDR काढा, हत्येच्या दोन दिवसांपूर्वी वाल्मिक कराडशी संपर्क; अमोल मिटकरींचे गंभीर आरोप
Video: राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार आणि सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सातत्याने राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्णपणे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या पाठिशी असून धनंजय मुंडेंवरचे आरोप म्हणजे मस्साजोग प्रकरणातून लक्ष विचलित करण्यासाठी आहेत. सध्या मस्साजोग प्रकरणात राजकारण सुरु आहे, बीडच्या अनेकांना धनंजय मुंडेंचा राजकीय काटा काढायचा आहे. सुरेश धस त्यांच्या प्रांताध्यक्षांचही ऐकत नाहीत. संतोष देशमुखांच्या हत्येआधीच्या दोनदिवसांपर्यंत सुरेश धस वाल्मिक कराडच्या संपर्कात होते. त्यामुळे, धस यांचा सीडीआर काढला पाहिजे, सुरेश धस (Suresh Dhas) यांचीही चौकशी व्हावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एबीपी माझाशी संवाद साधताना केली आहे. तसेच, सुरेश धस यांच्यासंदर्भातील अनेक प्रकरणाचे पुरावे योग्यवेळी आपण बाहेर काढणार आहोत. जानेवारी 2001 साली पाथर्डी तालुक्यातील एका गावात दरोडा, त्याच दरोड्याच्या म्होरक्याचे संबंध कोणासोबत होते हेही समोर आणणार असल्याचे मिटकरी यांनी म्हटले.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी भाजप आमदार आणि सध्या संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन सातत्याने राज्याचे कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंना लक्ष्य करणाऱ्या सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आमदार धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे यांच्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असून इतिहासात सुरेश धस हेच आका आहेत, असे आरोप मिटकरी यांनी म्हटले. विशेष म्हणजे संतोष देशमुखांच्या हत्येआधी 2 दिवस सुरेश धस यांनीच वाल्मिक कराड यांच्यासोबत फोनवरुन संपर्क केला होता, असा आरोपही मिटकरी यांनी केला आहे.
दरोडा टाकणारी दारासिंग उर्फ मारुती भोसले गँगच्या दरोडेखोरांच्या अंगावर सुरेश धस मित्रमंडळ असे टी शर्ट होते. ही भोसले गँग माझ्यासाठी कोणाचाही काटा काढू शकते, असा हा नेता कोण ते सगळ्यांना माहिती असल्याचे मिटकरी यांनी म्हटलं. आपणचं शहराचं वासेपूर करत दुसऱ्यांकडे बोट दाखवतोय. सुरेश धस यांनीच आष्टी, पाटोद्यासह बीडमध्येही हुकूमत तयार केली होती. इतिहासात तेच आका होते. मी त्यांच्यावर आरोप केले की मला थेट हत्येच्या धमक्या येत आहेत. पण, धस यांच्यावर खंडणी, हत्या, जमिनी बळकावणे आरोपांची यादी प्रचंड मोठी आहे. निवडणूक निकालानंतर पालकमंत्रीपद आपणास मिळेल असं धस यांना वाटलं होतं, पण ते मिळत नाही हे दिसत असल्याने धनंजय मुंडेंचा काटा काढण्याचं काम सुरू अहे, असेही मिटकरी यांनी म्हटलं.
सुरेश धस यांचा बोलवता धनी कोण?
8 हिंदू 2 मुस्लिम देवस्थानांची 1421 कोटींची 485 एकर जमीन कोणी हडप केली, हे बीडकरांना माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करत असताना किती निष्पापांचे मुडदे आष्टीतील बंगल्यात गाडले गेले हेही माहिती आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप प्रकणात विरोध करणाऱ्या राम खाडे सारख्या तरुणांचे किती हाल केले, हे बीडकरांना विचारा, असे म्हणत गंभीर आरोप मिटकरी यांनी केले आहेत. तसेच, संतोष देशमुखांच्या कुटुंबाला सुरेश धस हेच उचवकावत आहेत. सुरेश धस यांना वरिष्ठांनी सांगूनही त्यांची भाषा सुधारत नसेल तर त्यांचा बोलविता धनी कोण हेही शोधावं लागेल. जर सुरेश धस यांच्या जीभेचा पट्टा थांबला नाही तर आम्हीही अनेक प्रकरणं बाहेर काढू, असा इशाराही मिटकरी यांनी दिला आहे.
मिटकरींच्या टीकेला महत्त्व देत नाही
दरम्यान, अमोल मिटकरींच्या आरोपांना मी महत्व देत नाही, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. तसेच, यापूर्वीदेखील त्यांनी अमोल मिटकरींना सज्जड दम दिला होता. तू कोणाचाही नाद कर, पण माझा नाद करु नको, असे धस यांनी मिटकरींच्या टीकेवर प्रत्त्युत्तर देताना म्हटले होते.
लक्ष्मण हाकेंचेही धस यांच्यावर गंभीर आरोप
प्रभू रामचंद्राचे नाव घेऊन तुम्ही महाराष्ट्र आणि देशभरात देवस्थानाची जमीन हडपली. शंभू महादेवाच्या देवस्थानाचा फ्रॉड केला, असा गंभीर आरोप ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी केले आहेत. सत्तेत असलेल्या मंत्र्यावर एसीबीची धाड पडून त्याच्या PA कडे घबाड सापडलेले देशातील एकमेव नेते सुरेश धस असल्याचेही हाके यांनी म्हटलं आहे. तसेच, जरांगे आणि धस यांच्यात कोल्डवार सुरू असल्याचंही त्यांनी म्हटलं.