Amit Shah : 'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला
Amit Shah : काँग्रेस विरोधात भाजप ज्या जागा हरेल, त्या जागांच्या जोरावर काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल म्हणून काँग्रेसला विदर्भात पराभूत करणे आवश्यक आहे.
![Amit Shah : 'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला Amit shah explain strategy to bjp leader about vidhansabha election meet 2.48 lac people three times until the vidhansabha election Amit Shah : 'त्या' लोकांना निवडणुकीपर्यंत तीन वेळा भेटा; अमित शाहांनी भाजप नेत्यांना दिला विजयाचा फॉर्म्युला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/09/24/d46324d8196178086ab7c9026fe8143317271907186271002_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची लवकरच घोषणा होणार असून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. त्याच अनुषंगाने देशाचे गृहमंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह (Amit shah) यांनी आज भाजप (BJP) पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. आगामी निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्ता आणि नेता म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे, काय खबरदारी घ्यायला पाहिजे व काय रणनीती आखली पाहिजे यासंदर्भात कानमंत्र दिला. नागपूरमध्ये झालेल्या या बैठकीत अमित शाहांनी सज्जड दमही दिला आहे. बंडखोरी किंवा मतभेदातून होणारी फूट खपवून घेतली जाणार नाही, असेही स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारकडून सध्या योजनांची चलती सुरू आहे, त्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजना जोर धरुन आहे. तर, केंद्र सरकारच्याही योजनांचा लाभ राज्यातील कोट्यवधि नागरिकांना मिळत आहे. त्याच, अनुषंगाने शाह यांनी विजयाचा फॉर्म्युलाच सांगितला आहे.
काँग्रेस विरोधात भाजप ज्या जागा हरेल, त्या जागांच्या जोरावर काँग्रेस सत्तेच्या जवळ जाईल म्हणून काँग्रेसला विदर्भात पराभूत करणे आवश्यक आहे. आगामी निवडणुकांमध्ये बूथ प्रमुखांची जबाबदारी महत्त्वाची आहे. त्यामुळे, बूथवर दहा टक्के मत वाढवायची आहेत. येत्या नवरात्रीनंतर सुरू होणाऱ्या विजयादशमी ते धनत्रयोदशी या 11 दिवसांच्या कार्यकाळात कार्यकर्त्यांनी बुथ क्षेत्रात बाईक रॅली काढाव्या, प्रचार करावा, असे आवाहन शाह यांनी केले. तसेच, प्रत्येक बुथच्या कार्यक्षेत्रातील साधु, संत, महंत यांना भेटून त्यांचे सत्कार करा आणि भाजपची निवडणूक येत आहे असं त्यांना सांगा. महाराष्ट्रात 2 कोटी 47 लाख शासकीय योजनांचे लाभार्थी असून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळत आहे. त्यामुळे, या लाभार्थींना निवडणुकीपर्यंत किमान तीन वेळेला भेटायचे आहे, बोलायचे आहे, सरकारचे काम सांगायचे आहे, असा विजयी फॉर्म्युलाच शाह यांनी भाजप नेते व कार्यकर्त्यांना दिला आहे.
विरोधी पक्षाचे बुधवरील कार्यकर्ते सोबत घ्या
सरपंच पदाची निवडणूक पराभूत झालेल्या लोकांना भेटून त्यांना पक्षाशी जोडा, बुथवर विरोधी पक्षांचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांना आपल्या पक्षाशी जोडा. विरोधी पक्षाचे कार्यकर्ते बुथ स्तरावर आपल्या पक्षात आले, म्हणून तुमचं फारसा नुकसान होणार नाही. कारण ते बुथवरचे कार्यकर्ते आहेत, ते काय घेऊन जाणार, त्यामुळे जोरदार प्रयत्न करून विरोधी पक्षाचे बुथ रिकामे करा, त्यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत जोडा, असा मंत्रही शाह यांनी पदाधिकारी बैठकीत दिला आहे. राज्यातील सर्वच बचत गटाच्या महिलांना जोडा, सहकार क्षेत्रातील लोकांना पक्षाशी जोडा. पक्षांतर्गत मतभेद दूर करा, एक होऊन निवडणुकीला सामोरे जा. पार्टी जेव्हा उमेदवारी देते, तेव्हा पार्टीसमोर अनेक प्रश्न असतात. अनेक समीकरणं पाहावे लागतात, तेव्हा पक्षातील वरिष्ठ नेते मैत्री पाहत नाहीत, तर जिंकण्याची क्षमता पाहून उमेदवारी देत असतात, असे अमित शाह यांनी म्हटलं.
हेही वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)