Lok Sabha 2024 : पवार आणि शिवतारे संघर्षाची चर्चा! शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद पुन्हा चव्हाट्यावर, महायुतीतील मतभेद मविआच्या पथ्यावर
Baramati Mahayuti Seat Sharing : अजित पवार जेव्हा महायुतीसोबत आले तेव्हा विजय शिवतारेंनी त्यांचं महायुती स्वागत केलं होतं. आता तेच विजय शिवतारे पवारांना पाडण्यासाठी निवडणुकीला उभे राहणार आहेत.
Ajit Pawar vs Vijay Shivtare : खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या विरोधात महायुतीकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) लढणार असल्याची चर्चा सुरू असताना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केलं. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीतला संघर्ष समोर आला. अजित पवार (Ajit Pawar) जेव्हा महायुतीसोबत आले त्याच दिवशी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी अजित पवारांची मुंबईत जाऊन भेट घेतली आणि त्यांचं महायुती स्वागत केलं होतं. आता तेच विजय शिवतारे पवारांना पाडण्यासाठी निवडणुकीला उभे राहणार आहेत.
अजित पवार आणि शिवतारे यांच्या संघर्षाची चर्चा
पवारांना पाडा, असं शिवतारे म्हणाले आणि पुन्हा एकदा अजित पवार आणि शिवतारे यांच्या संघर्षाची चर्चा सुरू झाली. बारामती लोकसभा मतदारसंघाचा सातबारा कुणाच्या नावावर नाही, असे देखील शिवतारे म्हणाले. रविवारी पुरंदर तालुक्यातील महिला मेळाव्यात बोलताना शिवतारे यांनी पवारांवर तोफ डागली.
अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा संघर्ष
अजित पवार आणि विजय शिवतारे यांचा संघर्ष सर्वश्रुत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवारांनी शिवतारे यांना सांगून पाडले होते. पण यावरून विजय शिवतारे आणि अजित पवार महायुतीत येताच मनोमिलन देखील झालं होतं. पण, अचानक शिवतारे यांनी अजित पवार केलेल्या वक्तव्याची माफी मागणार का, असा सवाल विचारला आहे.
सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार
एकीकडे खासदार सुप्रिया सुळे यांना पाडण्याचा महायुतीने चंग बांधला असताना सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा जोरदर धरत आहे. परंतु या पवारांच्या विरोधात शिवतारे आगामी काळात लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याचे त्यांनी एबीपी माझाशी बोलताना दाखवून दाखवलं. त्यामुळे महायुतीतली खदखद पुन्हा एकदा समोर आली आहे.
बारामतीत पवारांचं वर्चस्व
बारामती लोकसभा मतदारसंघात गेली अनेक दशक पवारांचे वर्चस्व आहे. आजपर्यंत विजय शिवतारे किंवा हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांशी संघर्ष केला. अजित पवार महायुतीत आले असले तरी, आगामी लोकसभेत त्यांचाच प्रचार करणे, हे शिवतारे यांना मान्य नाही. तर हर्षवर्धन पाटील यांनी अजून महायुतीचा उमेदवार जाहीर नसल्याचं दोन दिवसापूर्वी इंदापुरात वक्तव्य केलं.
सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार, त्यातच शिवतारेंची उडी
बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक जणांचा अजित पवारांचा संघर्ष झाला आहे. जरी आता अजित पवार महायुतीमध्ये आले असले तरी अजित पवारांनी त्यांच्या मित्र पक्षाच्या लोकांना आघाडीत असताना दुखावलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार लढणार असल्याची चर्चा सुरू आहे, आता त्यातच शिवतारे यांनी उडी घेतली आहे. याचा फटका आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीत बसू शकतो
महायुतीतील हा मतभेद महाविकास आघाडीच्याच पथ्यावर
अजित पवारांनी विजय शिवतारे यांना सांगून पाडले होते हे आपण जाणतो. 2024 च्या निवडणूकित सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली तर अजित पवारांना विजय शिवतारे यांच्या मदतीची गरज लागणार आहे. शिवतारे यांच्याप्रमाणेच इंदापूरचे हर्षवर्धन पाटील, दौंडचे राहुल कुल यांची देखील मदत लागणार आहे. आजपर्यंत या ना त्या कारणाने अजित पवारांचा या सगळ्यांशी संघर्ष झाला आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हा महायुतीतील हा मतभेद महाविकास आघाडीच्याच पथ्यावर पडणार आहे. त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार, हे पाहणं महत्त्वाचे असणार आहे.