"आई-बापानं जन्माला घातलं, उचलली जीभ लावली टाळ्याला"; अजित पवार संजय राऊतांवर कडाडले
कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण यामुळं राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.
पुणे: सरडा आणि ढेकूण म्हणून राज्याचा कायापालट होणार आहे का? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधकांना विचारला आहे. अजित पवारांनी गुलाबी रंगाला आपलंसं केलं. यावरून सरडा ही रंग बदलतो अशी खोचक टीका शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) केली होती. त्याला उत्तर देताना अजित पवारांनी हा सवाल उपस्थित केला. ते जनसन्मान यात्रेत बोलत होते. जनसन्मान यात्रेदरम्यान पुण्यातील आंबेगाव विधानसभेत अजित पवारांनी विरोधकांवर असा निशाणा साधला.
अजित पवार म्हणाले, कोण आम्हाला शिव्या देतंय, कोण आम्हाला शाप देतंय तर कोण कोणाला सरडा म्हणतंय अन् कोण कोणाला ढेकूण म्हणतंय. पण यामुळं राज्याचे प्रश्न सुटणार आहेत का? राज्याचा कायापालट होणार आहे का? याचं उत्तर विरोधकांनी द्यावं.उगाच आई बापांनी जन्माला घातले म्हणून उचलली जीभ लावली टाळ्याला हे चालतं? आज जनता सुज्ञ आहे.
माझ्या माय माऊली, बांधवांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचेत : अजित पवार
जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासून मी पक्के ठरवले आहे की, मी फक्त विकासाचे बोलणार. गरिबीमध्ये जगत असणाऱ्या माझ्या माय माऊली, माझे बांधव यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे त्यांच्यासाठी योजना आणायच्या आहेत, असे अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले संजय राऊत?
सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे. पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आता पिंक झाले आहेत. सरडा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झाले. आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे हे माहीत नाही. पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जीण नाही. आपला रंग भगवाच आहे. केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो पिंक नही चलेंगा... एक तर भगवा चालेल नाहीतर तिरंगा चालेल. भगवाचं तिरंग्याला वाचवेल, असे बाळासाहेब म्हणायचे, असे संजय राऊत म्हणाले.
अजित पवारांच्या ताफ्याला काळे झेंडे
अजित पवारांच्या ताफ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवलेत. पर्यटन विषयी बैठकीला भाजपला डावलल्याने भाजप जुन्नर विधानसभा प्रमुख आशा बुचके आक्रमक झाल्यात.. त्यामुळे जुन्नरमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीतील स्थानिक पातळीवरील वाद चव्हाट्यावर आलाय. दरम्यान आशा बुचकेंसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
हे ही वाचा :
Ajit Pawar: 'माझ्या बायकोने जेवढा हात ओढला नसेल तेवढा...', अजितदादांच्या 'त्या' वक्तव्यानं पिकला एकच हशा, नेमकं काय घडलं?