नातेवाईकांना जेवण, पोशाख, हवं तर अंगठी देतो, पण...; अजित पवारांचा कार्यकर्त्यांना मिश्किल टोला
Maval Lok Sabha Election 2024 : नातेवाईकांना म्हणा 14 तारखेला या जेवण, पोशाख हवं तर अंगठी देतो, पण आता कुणाला बोलवू नका, असा मिश्किल टोला अजित पवार यांनी मारला आहे.
पुणे : मावळकरांनो, नात्या-गोत्याचा विचार करू नका. नातेवाईकांना म्हणा 14 तारखेला या जेवण, पोशाख, हवं तर अंगठी देतो, पण आता कुणाला बोलवू नका, असा मिश्किल टोला कार्यकर्त्यांना अजित पवार (Ajit Pawar) यांनी मारला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात (Maval Lok Sabha Constituency) श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ सभेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
जेवण, पोशाख, हवं तर अंगठी देतो, पण...
मावळकरांनो, ही निवडणूक महत्वाची आहे. नात्या-गोत्याचे राजकारण आणि विचार करू नका. नातेवाईकांना म्हणावं, या 13 तारखेला मतदान होणार आहे. 14 तारखेला या जेवण घालतो, पोशाख करतो हवं फार तर रुसू नये म्हणून अंगठी घालतो. या पद्धतीने सांगा आणि आत्ता कोणाला बोलावू नये.
मी मॅच फिक्सिंग करत नाही
त्या दिवशी मी अण्णा बनसोडे यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो. त्यावेळी बारणेंच्या विरोधी असणारे उमेदवार संजोग वाघेरे लक्ष देऊन उभे होते. मी स्टेजवर गेलो अन् गड्यानं पाय धरले. फोटो काढला अन् दादांनी आशीर्वाद दिले असं सोशल मीडियावर पसरवलं. मी एकदा शब्द दिला की, कोणाच्या बापाचं ऐकत नाही. मी मॅच फिक्सिंग करत नाही, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
गडबड केली तर त्याचं कामचं करून टाकेन
खालची टीम जरा गडबड करत आहे, माझं लक्ष आहे. सुनील शेळके बोलला आहे, जर गडबड केली तर, त्याचं कामचं करून टाकेन. तेव्हा खालच्या कार्यकर्त्यांनी कोणती गडबड करू नये. आपला उमेदवार हे श्रीरंग बारणेंचं आहेत, लक्षात ठेवा, असा सज्जड दम अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
अजित पवारांचा सज्जड दम
राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रत्येकाला सर्वांना सांगायचं आहे. आपल्याला व्यवस्थित काम करायचं आहे. राष्ट्रवादीच्या कोणी दगाफटका केलेला मी सहन करणार नाही. सुनील शेळके जसं म्हणाला आणि बाळा भेगडेंना पडलेल्या मतांचा जो उल्लेख केला, याची बेरीज केल्यावर जे लीड दिसतंय तितकं लीड बारणेंना मिळायला हवं. मविआ उमेदवार संजोग वाघेरेंचा आतून प्रचार करणाऱ्यांना अजित पवारांनी सज्जड दम दिला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :