Ajit Pawar in Phalthan: दादा, कुत्री उड्या मारतात, डिवायडर मोठे करा, तक्रार ऐकून अजित पवारांनी डोक्यावर हात मारला, आजपर्यंतचं सर्वात धमाल भाषण
Ajit Pawar in Phalthan speech: आमच्या शेतामधून आतापर्यंत 60-70 टन उस निघायचा. एआयचा वापर करुन तेच उत्पादन आता 100 टनापर्यंत जाईल. अजित पवारांनी सांगितलं एआय तंत्रज्ञानाचं महत्त्व.

Ajit Pawar in Phalthan speech: सरकारी विकासकामे करताना कॉन्ट्रॅक्टर चांगला असेल तर काम चांगले होते. जर कॉन्ट्रॅक्टर खराब असेल तर सरकारला पण त्रास होतो, अनेक कामं रेंगाळत राहतात. त्यामुळे ज्याला राजकारण करायचंय त्याने कॉन्ट्रॅक्टर बनू नका अन् ज्यांना कॉन्ट्रॅक्टर व्हायचंय त्याने राजकारणात येऊ नका, हा माझा कटाक्ष असतो, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले. ते शनिवारी फलटण (Phalthan) येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी त्यांच्या खास शैलीत भाषण करुन हशा पिकवला. यावेळी स्थानिक गावकऱ्यांच्या काही मागण्या ऐकून अजित पवार यांनी डोक्यावर हात मारुन घेतला.
यावेळी काही ग्रामस्थांनी गावातील वादांचा मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीकडून विरोधकांची अडवणूक केली जाते, अशी तक्रार त्यांनी अजितदादांकडे केली. यावेळी अजित पवार यांनी म्हटले की, ग्रामपंचायतीमधील लोक तुम्ही निवडून दिले आहेत. विकासकामांसाठी पैसे देणे माझे काम आहे. गावातील वाद हे थोरामोठ्यांनी एकत्र बसून आणि चर्चा करुन इथल्या लोकांनीच सोडवले पाहिजेत. ग्रामपंचायत निवडणुकीत मी तुम्हाला अमुकतमुक माणसाला निवडून आणायला बटन दाबायला सांगितले होते का? आता पायताण घ्या आणि माझ्या डोक्यात टाका, असे अजित पवार यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.
तुमच्या इथं कंपन्या आहेत त्यांचा टॅक्स जरा वाढवा. तुम्हाला फक्त 20 लाख टॅक्स मिळतोय. तुमचा धंदापाणी नीट करा. गावात एकोपा ठेवा, जातीय सलोखा ठेवा, जातीय वादातून कोणाचं भलं झालं नाही. बारामती ॲग्रो तर फक्त साडेतीन लाख रुपये टॅक्स देते. वाढवा जरा, तेव्हाचा काळ वेगळा होता आताचा वेगळा आहे. डिस्टलरी मालकांना सांगा दादांनी आवाहन केलं आहे असे सांगा, असे अजित पवार यांनी सांगितले. तसेच आगामी काळात शेतीमध्ये एआयचा वापर करण्याची गरज अजित पवार यांनी व्यक्त केली. आमच्या शेतामधून आतापर्यंत 60-70 टन उस निघायचा. एआयचा वापर करुन तेच उत्पादन आता 100 टनापर्यंत जाईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी शेतकऱ्यांना वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून 18 हजार रुपये दिले जात आहेत. मात्र, आगामी काळात हे पैसे कृषी विभाग कडून देण्याचा विचार सुरू आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar news: ग्रामस्थांच्या तक्रारी ऐकून अजितदादांनी डोक्यावर हात मारुन घेतला
अजित पवार यांच्या या भाषणावेळी अनेक मजेशीर प्रसंग पाहायला मिळाले. अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांच्या योगदानाचा उल्लेख करताना काही जणांची नावे घेतली. त्यावेळी समोरच्या प्रेक्षकांमधून एकजण उठला आणि त्याने तुम्ही साडेतीन वर्षे सरपंच राहिलेल्या व्यक्तीचे नाव घेतले नाही, अशी तक्रार केली. त्यावर अजित पवार म्हणाले की, मी इथं लोकांची नावं घ्यायला आलोय की काम करायला आलोय. मी कधी बायकोचं नाव घेतलं नाही. इथे मी उखाणे घ्यायला आलो आहे का? तुम्ही डोक्यावर पडलात का तुम्ही, असा सवाल अजित पवारांनी समोरच्या व्यक्तीला विचारला.
यानंतर अजित पवार यांनी बारामतीपर्यंत जाणारे रस्ते कसे चांगले केले आहेत, याचा उल्लेख केला. त्यावेळी एका माणसाने अजित पवारांना सूचना केली की, 'दादा रस्त्यावरील डिव्हायडर थोडे मोठे करा. कुत्री उडी मारुन गाडीसमोर येतात. त्यावेळी अजित पवार मिश्कीलपणे म्हणाले की, 'मी कुत्र्यांना सांगतो उडी मारु नका'. त्यांच्या या वक्तव्यावर हशा पिकला.अजित पवार निघत असताना एका व्यक्तीने म्हटले की, दादा आमच्या फलटणला पदरात घ्या. त्यावर अजित पवार म्हणाले, 'आता माझा पदर फाटलाय.' यानंतर अजित पवार यांनी फलटणमधील विकासकामांकडे लक्ष देण्याचे आश्वासनही दिले.
Mumbai News: मुंबईत महिलांसाठी 194 कोटीच्या मॉलचे काम सुरु: अजित पवार
मुंबईत 194 कोटीच्या मॉलचे काम सध्या सुरू आहे. महिलांनी ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्याची विक्री त्या ठिकाणी होणार आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात 15 कोटींचा मॉल बनवणार आहोत. तसेच तालुक्याच्या ठिकाणी देखील बनवणार आहे. मला आता इथं निधी मागितला तुमची तुम्हीच काम करून घ्या. या योजनेतून सगळीच काम होतील. त्या योजनेचा फायदा घ्या. आता मोटरसायकल असेल तरी त्याला घर दिले जाणार आहे. आतापर्यंत 44 लाख घर आपण मंजूर केले आहेत. मागच्या आणि आताची धरून राज्य बँकेंना पूरग्रस्तांना दहा कोटी रुपये दिले. त्याचेच आमच्यावरती आरोप होत आहेत. आरोप करणारे करत असतात. पण त्या बँकेने दहा कोटी रुपये दिले, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
औंधच्या राणीसाहेबांनी म्यानातून तलवार उपसली, हवेत नाचवली, अजित पवार बघतच बसले























