Sharad Pawar: शरद पवारांच्या बेरजेच्या राजकारणाला वेग, आता अहिल्यादेवी होळकरांचे वंशज भूषणसिंह होळकर तुतारी हाती धरणार
Sharad Pawar camp: गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार यांनी अनेक नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. शरद पवार यांचे हे बेरजेचे राजकारण महायुतीच्या 45 पारच्या मनसुब्यांना सुरुंग लावू शकते. भूषणसिंह होळकर शरद पवार गटात प्रवेश करणार
पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वाधिक पावसाळे पाहिलेला आणि मुरब्बी नेता असलेले शरद पवार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवार (Sharad Pawar) हे आपल्या पक्षाची ताकद वाढवण्याच्यादृष्टीने त्यांच्या बेरजेच्या राजकारणाचा प्रभावीपणे वापर केला आहे. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांनी आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांना सोबत घेतले आहे. अहिल्यादेवी होळकरांचे वंशज असलेले भूषणसिंह होळकर (Bhushan Singh Holkar) हे लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
लोकसभा निवडणुकीत भूषण सिंह होळकर हे शरद पवार गटाचे स्टार प्रचारक असतील. तसेच भूषणसिंह होळकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागणार आहे. विशेष म्हणजे तीन वर्षांपूर्वी याच भूषणसिंह होळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र डागले होते. मध्यंतरी जेजुरीतील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या लोकार्पणाचा वाद चांगलाच गाजला होता. त्यावेळी शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पणाला विरोध करण्यात आला होता. तेव्हा भूषणसिंह यांनी, होळकरांच्या सातबाऱ्यावर पवार कुटुंबियांचा डोळा असल्याचा आरोप केला होता. मात्र, आता तेच भूषणसिंह होळकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांनी आणखी एका विरोधकाला स्वत:च्या बाजूने वळवण्यात यश मिळवले आहे. यापूर्वी शरद पवार यांनी चंद्रराव तावरे, अनंत थोपटे आणि बारामतीमधील पवार कुटुंबीयाचे पारंपरिक विरोधक असलेल्या काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन राजकीय शत्रुत्त्वाला तिलांजली दिली होती.
धैर्यशील मोहिते पाटील यांचा शरद पवार गटात प्रवेश
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचे केंद्रस्थान ठरत असलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे नेते धैर्यशील मोहिते पाटील यांनी रविवारी शरद पवार गटात प्रवेश केला. यानिमित्ताने मोहिते-पाटील घराण्याकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. मोहिते-पाटील घराणे पु्न्हा शरद पवार यांच्यासोबत आल्याने राष्ट्रवादीची माढा आणि सोलापूरच्या राजकारणातील ताकद आणखीन वाढणार आहे.
आणखी वाचा