Sanjay Raut: एकनाथ खडसेंच्या जावयावरील कारवाईनंतर महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद; राऊतांनी पुन्हा एकदा सांड म्हणत गिरीश महाजनांना डिवचलं
Sanjay Raut: कारवाईनंतर हे राजकीय षडयंत्र असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या कारवाईनंतर असुरी आंनद झाला असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुंबई: कधीकाळी भाजपचे ज्येष्ठ नेते राहिलेले एकनाथ खडसे आणि भाजप नेते आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये हनी हनी ट्रॅप वरून वाद पेटला असल्याचं काही दिवसांपासून दिसून आलं, अशातच काल(रविवारी) एकनाथ खडसे यांचा जावईच पुण्यामध्ये रेव्ह पार्टी करताना रंगेहाथ सापडल्याने राज्यामध्ये पुन्हा खळबळ उडाली आहे. एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना काल (रविवारी) पुण्यामध्ये रेव्ह पार्टीमध्ये पोलिसांनी अटक करण्यात आली आहे. या कारवाईनंतर हे राजकीय षडयंत्र असल्याच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांना या कारवाईनंतर असुरी आंनद झाला असल्याचं म्हणत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता
संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, ही रेव्ह पार्टी संशयास्पद वाटत आहे. चार दिवस वॉच ठेवून ही कारवाई केली आहे. इतका वॉच जर पेहलगाममध्ये ठेवला असता तर आज 26 बहिणींचे कुंकू पुसले नसते. ते दहशतवादी असे आत घुसले नसते, ते पळून गेले नसते. तुम्ही पाहिले असेल काल गिरीश महाजनांच्या चेहऱ्यावर असुरी आनंद होता. हा असुरी आनंद तुम्ही पाहिला असेल तर यामागे काय घडतंय काय घडवलंय हे तुम्हाला लक्षात येईल. इतका आनंद गिरीश महाजन यांना का व्हावा? खडसेंचा जावई पकडला गेला त्यांना अटक केली, आपण मंत्री आहोत हे भान त्या माणसाला(महाजनांना) नाही. काल ज्याचा उल्लेख फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातला मोकाट सुटलेला सांड आहे असा केला आहे, असं मी काल म्हटलं आहे आणि ते खरं आहे. हाच फडणवीस यांना अडचणीत आणणार असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
ते नाचायचेच बाकी होते..
तर या महाराष्ट्रातील सर्व गुंड, दरोडेखोर, बलात्कारातील गुन्ह्यातील आरोपी यांना घेऊन पक्ष उभा केला जात आहे. त्यांना आता रवींद्र चव्हाण यांची साथ मिळते आहे. नैतिकता ही या राज्याच्या राजकारणात राहूच नये अशा प्रकारची भूमिका भारतीय जनता पक्षातील या लोकांची आहे. काल जो रेव्ह पार्टीचा प्रकार झाला तो जर खरा असेल तर या प्रकरणात निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि जी काही कठोर कारवाई असेल ती होईल, पण गिरीश महाजन यांच्या चेहऱ्यावरती फक्त आनंद होतात, ते नाचायचेच बाकी होते, त्यांची जी काही बॉडी लँग्वेज होती, फक्त आता खडसे आणि त्यांचा जावई सापडला. आम्ही राजकारणात कोणाच्या कुटुंबापर्यंत जात नाही. पण दुर्दैवाने भाजपचे लोक कुटुंबापर्यंत पोहोचायला लागले, त्यांना बदनाम करायला लागले आहेत. खडसे गेल्या तीन दिवसापासून हनी ट्रॅपवर बोलत होते. हनी ट्रॅप मध्ये काही लोकांना अटक केली आहे, त्यांची नीट चौकशी करा असं ते सांगत होते. त्या हनी ट्रॅपमध्ये गिरीश महाजन यांचा असलेल्या सहभागाबद्दल ते बोलत आहेत, त्याच्यावर तपास नाही. त्याच्यावर छापा पडत नाहीत, त्या संदर्भात पोलिसांना जाग नाही, पण अचानक खडसे बोलतात, म्हणून जावायला असं उचललं हे महाराष्ट्रात सर्वत्र सुरू आहे. जो तुमच्या विरोधात बोलेल त्याच्याकडे पोलीस जातात. त्याच्या घरात पोलीस घुसतात, त्याच्या मित्राकडे पोलीस घुसतात. पोलीस हे चाकर झालेले आहेत, भाजपा हीच एक गुंडांची रेव्ह पार्टी झाली आहे. संपूर्ण भाजपमध्येच रेव्ह पार्टीचा माहोल आहे असे पुढे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
























