31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार अन् अजित पवार मुख्यमंत्री होणार; खासदार संजय राऊतांचं भाकित
निवडणूक निकालांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओपिनिअन पोलची दिशा म्हणजे 2024 च्या सत्तापरिवर्तनाची झलक आहे.
MP Sanjay Raut: पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणला जातोय, असं वक्तव्य ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं आहे. दत्ता दळवी (Dutta Dalvi) निष्ठावान सैनिक, कधीच झुकणार नाहीत, जबरदस्ती जेलमध्ये डांबून ठेवलं जातंय, टाईमपास सुरु आहे, असं म्हणत संजय राऊतांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. तसेच, पाच राज्यांच्या निवडणुकांवरही संजय राऊतांनी भाष्य केलं आहे. त्याचप्रमाणे यावेळी बोलताना संजय राऊतांनी एक भाकीतही केलं आहे. 31 डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद रिकामं होणार आणि अजित पवार (Ajit Pawar) मुख्यमंत्री होणार, असं भाकीत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केलं आहे.
निवडणूक निकालांपूर्वी जाहीर झालेल्या एक्झिट पोलबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले की, ओपिनिअन पोलची दिशा म्हणजे 2024 च्या सत्तापरिवर्तनाची झलक आहे. तसेच, 2024 मध्ये भाजपपासून देशाला मुक्तता मिळणार असल्याचंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बोलताना म्हणाले की, "पोलीस आणि न्यायव्यवस्थेवर दबाव आणून ज्या गुन्ह्यांमध्ये जामीन मिळू शकतो, अशा गुन्ह्यांमध्येही राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात ठेवायचं आणि आमच्याकडे सत्ता आहे. आम्ही राजकीय विरोधकांच्या विरोधात सत्ता कशी वापरू शकतो, हे दाखवण्याचा प्रयत्न. पोलिसांनी स्वतःची बाजू न्यायालयात वेळेत मांडू नये म्हणून दबाव टाकला जात आहे. असं करुन कार्यकर्त्यांना तरुंगात ठेवायंच. काही हरकत नाही ठेवा तुम्ही, 2024 पासून उलटं चक्र सुरू होईल. तुम्ही काँग्रेसमुक्त भारतची घोषणा केली होती. पण, त्या काँग्रेसनं, त्या काँग्रेसच्या राहुल गांधींनी, प्रियांका गांधींनी, मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसमुक्त भारत ही गर्जना करणाऱ्यांना घाम फोडला. पंतप्रधानांना आठ-आठ दिवस एका राज्यात राहावं लागतंय. गृहमंत्र्यांना अख्खा देश वाऱ्यावर सोडून राहावं लागतंय. हे तुमचं काँग्रेसमुक्त भारतचं लक्षण नसून 2024 ला तुमच्यापासून भारताला मुक्ती मिळणार आहे, त्याची हवा आहे. मला पूर्ण खात्री आहे, राजस्थानसह इतर सर्व राज्यांमध्ये इंडिया आघाडीचं सरकार असेल."
तेव्हा काय घडलं त्याला महत्व नाही, आज काय होतंय ते महत्वाचं : संजय राऊत
2004 सालीच राष्ट्रवादी आणि भाजपच्या युतीचा निर्णय झाला होता. तर 16-16-16 च्या फॉर्म्युलानुसार लोकसभा लढवण्याचा निर्णय झाला होता असा गौप्यस्फोट प्रफुल पटेल यांनी केलाय. यावर संजय राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले की, प्रफुल पटेल, सुनिल तटकरे काय बोलतात आणि 2004, 2009 याबद्दल आज बोलणार नाही. तेव्हा काय घडलं त्याला महत्व नाही, आज काय होतंय ते महत्वाचं आहे.