दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं, आज आदित्य ठाकरे महाआरती करणार; रवी राणाही भेट देणार
Dadar Hanuman Mandir : एकीकडे आज साडे पाच वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हनुमान मंदिरात महाआरती होणार असताना आमदार रवी राणा हे देखील मंदिरात जाणार आहे.
मुंबई : रेल्वेने दादरचे 80 वर्षे जुने हनुमानाचे मंदिर (Hanuman Mandir) पाडण्यासाठी नोटीस बजावली. यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर (BJP) टीकास्त्र डागले. 'एक है तो सेफ है म्हणतात, पण मंदिरही सेफ नाहीत', अशी टीका त्यांनी केली होती. तर ठाकरेंच्या टीकेला भाजपने देखील चोख प्रत्युत्तर दिले. हिंदू मत मिळवण्यासाठी हा केविलवाणा प्रयत्न उद्धव ठाकरे करत असल्याचे भाजपने म्हटले. तर आज सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाकडून दादरच्या (Dadar) हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. आमदार रवी राणा (Ravi Rana)देखील हनुमान मंदिरात जाणार असल्याने राजकारण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत आज दादरच्या हनुमान मंदिरात सायंकाळी महाआरती होणार आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray), शिवसेना नेते, मी, स्थानिक आमदार महेश सावंत आणि हजारो शिवसैनिक त्या आरतीला जाणार असल्याची माहिती दिली आहे. तर हिंदू म्हणून भारतीय जनता पक्षाची इच्छा असेल तर त्यांनी आरतीला यावे. आम्ही त्यांच्या हातात गदा आणि घंटा देऊ, असा टोला देखील त्यांनी भाजपला लगावलाय.
हनुमान मंदिरावरून राजकारण तापलं
एकीकडे साडे पाच वाजता शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने हनुमान मंदिरात महाआरती होणार असताना आमदार रवी राणा हे देखील तिथे जाणार आहे. आमदार रवी राणा यांची पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यामुळे कोणतेही मंदिर तुटणार नाही, असा विश्वास पोस्टद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. तर आमदार रवी राणा आज मुंबईत दादरच्या हनुमान मंदिरात दर्शनाला जाणार, असे देखील पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यामुळे दादरच्या हनुमान मंदिरावरून राजकारण तापल्याचे दिसून येत आहे.
किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर टीका
तर दुसरीकडे दादरच्या हनुमान मंदिरात आज चार वाजता भाजप नेते किरीट सोमय्या दर्शनाला जात आहेत. किरीट सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटावर आरोप केले आहेत. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ते हिंदुत्त्वाचा मुद्दा घेत आहेत. कारण या मुद्द्यावर त्यांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. ज्यांनी हनुमान चालिसा वाचणाऱ्यांना जेलमध्ये टाकले त्यांना हनुमानाच्या चरणी जावे लागत आहे. देव त्यांना सद्बुद्धी देवो. मुस्लिम मराठी सेवा संघटनेच्या सदस्यांना उद्धव ठाकरे यांनी चहा पाजला. मुस्लिम वस्त्यांमध्ये व्होट जिहादचे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले. म्हणून आता महापालिकेत त्यांना हिंदुत्वाचा भगवा झेंडा आठवत आहे. महाराष्ट्रातील जनता जागी झाली आहे. मंदिराचा विषय कालच संपला आहे. रेल्वेने त्यांना सांगितलं आहे की, हनुमान मंदिर पाडणार नाही. पण, त्यांना भीती वाटते आहे म्हणून त्यांचे हिंदुत्वाकडे जाण्याचे प्रयत्न सुरू आहे. रेल्वेने सांगितलं आहे की, आम्ही आता क्लिअरिफिकेशन देणार आहोत. कुठेही मंदिर तोडले जाणार नाही. आम्ही चार वाजता त्या ठिकाणी मारुतीचे दर्शन घ्यायला जाणार आहोत. लोकांनी त्यांचे कपडे उतरविले आहेत. भगवेही गेले, हिरवेही गेले, आता उरलेले वीस किती दिवस टिकणार? असा टोला देखील किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
आणखी वाचा