Prashna Maharashtrache : बेरोजगार तरुणांचा प्रश्न सर्वात मोठा, शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक; बाळासाहेब थोरात
Prashna Maharashtrache : दोन वर्षाच्या कोरोना काळात सर्व विभानांनी चांगलं काम केलं. यात महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी होती, असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
Prashna Maharashtrache : दोन वर्षाच्या कोरोना काळात सर्व विभानांनी चांगलं काम केलं. यात महसूल विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांवर महत्वाची जबाबदारी होती, असं राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. एबीपी माझाच्या प्रश्न महाराष्ट्राचे या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत.
दोन वर्षात महसूल गोळा करण्यात अडचणी आल्या: थोरात
बाळासाहेब थोरात म्हणाले की, ''राज्यात जो महसूल एकत्र होत असतो, त्यात मर्यादित वाटा (महसूल विभागाचा) आमचा आहे. नोंदणी व मुद्रांक शुल्क यातून खरा महसूल गोळा होत असतो. या दोन वर्षात आम्हाला त्यात अडचणी आल्या. कारण पूर्णपणे मुद्रांक शुल्क कार्यालय बंद होते. हे असं असलं तरी आम्ही त्यात काही निर्णय घेतले. ज्यात आम्ही पहिल्या टप्प्यात घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्कात तीन टक्के सवलत दिली. दुसऱ्या टप्प्यात दोन टक्के सवलत दिली. यात आम्हाला मोठा प्रतिसाद मिळाला. ज्यामुळे कोरोना काळात जितका महसूल गोळा झाला नाही, तितका आम्हाला या काळात मिळाला. यामुळे अर्थव्यवस्थेला चांगली गती मिळाली.''
बेरोजगार तरुणांचा प्रश्न सर्वात मोठा: थोरात
राज्यातील बेरोजगारीच्या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले आहेत की, ''बेरोजगारीचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्राचा प्रश्न नाही. हा संपूर्ण देशापुढील प्रश्न आहे. आपल्या देशाची लोकसंख्या पाहिली तर यातील मोठा घटक हा तरुण आहे. तरुणांचा वाटा मोठा आहे. गावागावात अशी खूप मोठी संख्या आहे, ज्यांच्या हाताला काम नाही. त्यांना काम देण्याची आवश्यकता आहे. देशाच्या विकासाचा विचार करताना बेरोजगार तरुणाचा प्रश्न हा सर्वात मोठा.''
शेतीवरचा भार कमी करणं आवश्यक: थोरात
थोरात म्हणाले की, ''रोजगार कशा पद्धतीने निर्माण होणार, हा प्रश्न आहे. शेतीची मर्यादा आहे. शेतीच्या वाटण्यात होतात. अनेक प्रश्न शेतीशी संबंधित आहे. शेतीवरील भार कमी करणं आवश्यक आहे. शहरात ही किती रोजगार निर्माण होतात... म्हणून या सर्वात नगर जिल्ह्यातच म्हटलं तर दुधाच्या व्यवसायातून गरीब माणूस सुद्धा दोन-तीन गायी पाळतो. दूध काढतो, ते विकतो यातून रोजगार निर्माण होतो. आपल्याला अशा काही गोष्टी कराव्या लागतील ज्यातून रोजगार तयार होईल आणि तरुणांना काम मिळेल. यातून अर्थव्यवस्था देखील सुधारेल. नीती आयोग देखील यावर विचार करत असेल. मात्र यावर अधिक काम करण्याची आवश्यकता आहे.''
वाळू माफियांच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले...
वाळू माफियांच्या प्रश्नावर बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले की, ''विकासाच्या कामाला, बांधकामाला खूप गती आली आहे. त्याचा पुरवठा वाळू असून हा त्याचा अविभाज्य भाग झाला आहे. यात दगडांपासून कुत्रिम वाळू देखील तयार केली जाते. मात्र आज तरी वाळू वापरली जात आहे. त्याची मागणीपेक्षा पुरवठा कमी आहे. दुसरी अडचण म्हणजे, यात विशेष विभाग येतो पर्यावरण विभाग. यात वाळू प्रश्नावरून अनेक पर्यावरणवादी न्यायालयात जात असतात. ज्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करून आम्हाला काम करावं लागतं.'' ते म्हणाले, ''यातच वाळू माफिया सक्रिय झाले आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आम्ही कडक कायदे केले आहेत. त्यानुसार कारवाई करण्यात येते.''