Aaditya Thackeray Dasara Melava: ...आणि म्हणोन, आणि म्हणोन;दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंची मिमिक्री करत उडवली खिल्ली
Aaditya Thackeray Speech: आदित्य ठाकरे यांनी शिवतीर्थावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा
मुंबई: गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत एकतरी नवा रस्ता झाला नाही. मध्यंतरी कोणीतरी म्हणत होतं, गेल्या दोन वर्षांत आणि म्हणोन... आणि म्हणोन... शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करत होतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2024) व्यासपीठावरुन बोलत होते.
एकनाथ शिंदे यांनी, '...आणि म्हणोन, आणि म्हणोन...' बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला. मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की, या प्रकल्पाच्या फाईलवर सही करु नका. अन्यथा एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. तुम्हाला आत राहायचं आहे की बाहेर राहायचं आहे, हे तुम्हीच ठरवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.
शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आम्ही दाव्होस आर्थिक परिषदेला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.
अदानींचे सर्व जीआर निघेपर्यंत आचारसंहिता लागणार नाही: आदित्य ठाकरे
मी दसरा मेळाव्यात पहिल्यांदा भाषण करतोय. लहानपणापासून आमच्यासाठी वर्षातील सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दसऱ्याचा असायचा, यादिवशी आजाचं भाषण असायचं, तेव्हा आम्ही मैदानात बसून भाषण ऐकायचो, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. यावेळी आदित्य ठाकरे यांनी महायुती सरकारवर एक गंभीर आरोप केला. हे सरकार सध्या हजारो निर्णय घेत आहे. विधानसभेची आचारसंहिता लागण्यापूर्वी सरकार निर्णय घ्यायला घाई करत आहे. पण मला एका अधिकाऱ्याने सांगितले की, जोपर्यंत अदानीचे सर्व जीआर निघणार नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
आणखी वाचा