(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'गेहलोत कॅम्पचे 65 आमदार पायलट यांना मुख्यमंत्री करायला तयार नाही', गेहलोत घेणार पक्ष प्रभारींची भेट
Rajasthan Politics: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. अशातच ते अध्यक्ष झाले तर गेहलोत हे आपलं मुख्यमंत्रीपद सोडतील अशी चर्चा आहे.
Rajasthan Politics: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवत असल्याची चर्चा आहे. अशातच ते अध्यक्ष झाले तर गेहलोत हे आपलं मुख्यमंत्रीपद सोडतील अशी चर्चा आहे. याच चर्चेदरम्यान काँग्रेसने आज विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निकटवर्तीय असलेल्या मंत्री शांती धारीवाल यांच्या घरी गेहलोत गटाच्या आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीत सचिन पायलट यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थान सरकारमधील मंत्री शांती धारिवाल यांच्या घरी जवळपास 65 आमदार या बैठकीला उपस्थित आहेत. यामध्ये 18 हुन अधिक मंत्र्यांचा समावेश आहे. बैठकीत ठरवण्यात आलेल्या रणनीतीनुसार हे सर्व आमदार, मंत्री निरीक्षकांसमोर हायकमांडने निश्चित केलेल्या नावाला सहमती दर्शवणार नाहीत. तर इतर आमदारांपैकी कुणालाही मुख्यमंत्री बनवण्यात यावे, अशी मागणी करतील. म्हणजेच सचिन पायलट यांच्या नावाला हे आमदार विरोध दर्शनावर असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. सचिन पायल यांचं नाव पुढे गेल्यास गेहलोत गटाच्या आमदारांकडून बंड केला जाऊ शकतो, असेही सूत्रांनी सांगितले आहे.
या बैठकीमुळे विधीमंडळ पक्षाची बैठक लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशोक गेहलोत नुकतेच घरातून बाहेर पडले असून आता मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांना भेटण्यासाठी ते हॉटेलमध्ये जाणार आहेत. सायंकाळी 7.30 वाजेपासून विधिमंडळ पक्षाची बैठक होऊ शकते. जयपूर येथे होणाऱ्या या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी मल्लिकार्जुन खर्गे आणि अजय माकन यांची निरीक्षक आणि प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे.
जयपूरमध्ये होणाऱ्या सीएलपीच्या बैठकीबाबत काँग्रेस आमदार राजेंद्र सिंह गुडा म्हणाले की, जर सर्व 101 आमदार सीएलपीच्या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत, तर सरकार बहुमत गमावणार नाही का? मी या बैठकीला उपस्थित नाही. माझ्या घरी आमदार उपस्थित आहेत. आम्ही काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, 2020 मध्ये काँग्रेसच्या राजकीय संकटातही राजेंद्र सिंह गुडा अशोक गेहलोत यांच्यासोबत होते.
दरम्यान, काँग्रेस अध्यक्षपद आणि राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अशोक गेहलोत म्हणाले होते की, काँग्रेसच्या आजपर्यंतच्या इतिहासात जो कोणी अध्यक्ष झाला तो मुख्यमंत्री झाला नाही. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले होते की, काँग्रेस पक्षात एक व्यक्ती आणि एक पद हे तत्व आहे. कोणालाही एकापेक्षा जास्त पद मिळू नये.