Ramdas Athawale: एकाच परिवारातील 5-5 जण पीएचडी करायला लागले, अजित पवारांचं विधान; आता रामदास आठवलेंचं प्रत्युत्तर, म्हणाले, विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका!
Ramdas Athawale: कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही, असंही रामदास आठवलेंनी म्हटलं आहे.

पुणे: राज्याच्या हिवाळी अधिवेशनामध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पीपीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे. सध्या पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अवाढव्य खर्च होत आहे. "मी मध्यंतरी माहिती घेतली असता, ठराविक विद्यार्थ्यांवरच कित्येक शे कोटी रुपये खर्च होत आहेत. संस्थेचा जवळपास 50 टक्के निधी केवळ पीएचडीच्या विद्यार्थ्यांवर जात असल्याने बाकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. 42-45 हजार रुपये महिना मिळतो म्हटल्यावर एकाच घरात 5-5 लोक पीएचडीला प्रवेश घेत आहेत. विषय निवडतानाही प्रश्न पडतो की नक्की कोणत्या संशोधनासाठी लाभ द्यायचा", असं वक्तव्य अजित पवारांनी केलं, त्यांच्या या वक्तव्यावरती केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी आपली भूमिका मांडत नाराजी व्यक्त केली आहे. (Ajit Pawar)
Ramdas Athawale: शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार
रामदास आठवले यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा दाखला देत म्हटलंय की, "अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे. त्यामुळे शिष्यवृत्ती ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही; ती वंचित, कष्टकरी आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा घटनात्मक अधिकार आहे."
Ramdas Athawale: कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही
अजित पवार हे माझे मित्र आहेत आणि ते फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांशी निष्ठावान नेते म्हणून ओळखले जातात. त्यामुळे त्यांनी केलेले हे वक्तव्य आश्चर्यकारक आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात स्पष्टपणे लिहून ठेवले आहे की शिक्षण हा प्रत्येक माणसाचा मूलभूत अधिकार आहे.…
— Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 14, 2025
पुढे आठवलेंनी म्हटलंय की, जर एकाच कुटुंबातील पाच विद्यार्थी पीएचडीपर्यंत पोहोचत असतील, तर त्यावर शंका घेण्याऐवजी समाजाने आणि शासनाने अभिमान व्यक्त केला पाहिजे. ही परिस्थिती म्हणजे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रत्यक्षात उतरलेला विजय आहे. आत्मसन्मान, समता आणि संविधानाने दिलेला हक्क जपण्यासाठी आहे. कोणतेही शिक्षण कमी–जास्त नसते. प्रत्येक विषय, प्रत्येक अभ्यासक्रम आणि प्रत्येक ज्ञानशाखा समाजासाठी तितकीच महत्त्वाची असते. कोणता अभ्यास ‘उपयुक्त’ आणि कोणता ‘अनावश्यक’ हे ठरवण्याचा अधिकार कोणालाही नाही. आज वंचित समाजातील विद्यार्थी पीएचडी, संशोधन आणि परदेशी शिक्षणापर्यंत पोहोचत आहेत हेच खरे सामाजिक परिवर्तनाचे जिवंत उदाहरण आहे. गैरप्रकार असतील तर कारवाई करा; पण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर हात टाकू नका! विद्यार्थ्यांशी चर्चा न करता घेतलेला कोणताही निर्णय आम्ही मान्य करणार नाही", असा इशाराही रामदास आठवलेंनी दिला आहे.























