(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Parbhani Accident: परभणीत ट्रॅक्टर आणि क्रुझरचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू, 6 जखमी
Parbhani Accident : घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Parbhani Accident : परभणीच्या (Parbhani) यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आलेल्या परतुर येथील भाविकांच्या गाडीला भीषण अपघात (Accident) झाला असून, यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, सहा जण जखमी झाले आहेत. हा अपघात इतका भीषण होता की, अडकलेली क्रूजर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. सोबतच जखमींना स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे एकूण 9 जण परभणीच्या यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. दर्शन झाल्यानंतर परत जात असताना पाथरी तालुक्यातील वडीपाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये मध्यरात्री भीषण अपघात झाला. ज्यामध्ये गाडीतील अमोल मारुती सोळंके, अण्णासाहेब हरिभाऊ सोळंके, दिगंबर भिकाजी कदम या 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, कृष्णा सखाराम सोळंके, उमेश भारत सोळंके, संतोष कुंडलिक पांचाळ, अविनाश चंदू पाटील सोळंके, दशरथ सुदामराव, किशोर सोळंके हे 6 जण जखमी झाले असुन, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
दर्शनाहून निघाले होते परत...
जालना जिल्ह्यातील परतुर येथील ब्राह्मण वाडीचे काही भाविक परभणी जिल्ह्यातील यशवाडी येथील मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी वेगवेगळ्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. दर्शन झाल्यावर हे भाविक पुन्हा जालना जिल्ह्याकडे परत निघाले होते. दरम्यान, रात्रीचा प्रवास सुरु असतानाच भाविकांच्या क्रुझर आणि ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरमध्ये जोरदार धडक झाली. ज्यात, एकूण 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान, इतर 6 भाविक देखील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
क्रुझर गाडी जेसीबीने बाहेर काढावी लागली.
ऊस घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि जालना जिल्ह्यातील भाविकांच्या क्रुझरमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. मात्र, हा अपघात एवढा भीषण होता की, क्रुझरचा समोरील भाग थेट ट्रॅक्टरच्या ट्रालीत जाऊन घुसला. त्यामुळे क्रुझर गाडी बाहेर काढण्यासाठी चक्क जेसीबी बोलवावा लागला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त क्रुझर बाजूला करण्यात आली. तसेच, मृत भाविकांचे मृतदेह शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. तसेच, अपघातग्रस्त भाविकांच्या नातेवाईकांना याबाबत माहिती कळवण्यात आली आहे.
घटनास्थळी पोलीस दाखल...
परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील वडी पाटीजवळ ट्रॅक्टर आणि क्रुझरमध्ये भीषण अपघात झाला असल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच, पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले. सोबतच, जेसीबीच्या मदतीने अपघातग्रस्त दोन्ही वाहनं रस्त्याचा बाजूला केले.
इतर महत्वाच्या बातम्या: