Somnath Suryawanshi Case: बाबासाहेब आंबेडकरांचा नातू सोमनाथ सूर्यवंशींसाठी काळा कोट घालून युक्तिवाद करणार, आज पहिली सुनावणी
Parbhani violence Somnath Suryawanshi: परभणी हिंसाचारावेळी पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना ताब्यात घेतले होते. मात्र, पोलीस कोठडीत त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता.

परभणी: पोलीस कोठडीत संशयास्पदरित्या मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची पहिली सुनावणी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतीची विटंबना झाल्यानंतर परभणीत हिंसाचार उसळला होता. यानंतर पोलिसांनी काहीजणांना अटक केली होती. यापैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. मात्र, राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर सोमनाथच्या मृत्यूप्रकरणात दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी, यासाठी सोमनाथ यांच्या आईने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर आज पहिली सुनावणी होणार असून यावेळी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईच्या बाजूने वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर हे स्वत: युक्तिवाद करणार आहेत. प्रकाश आंबेडकर हे प्रकरण न्यायालयासमोर मांडणार आहेत. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत सर्व तयारी पूर्ण केली होती. प्रकाश आंबेडकर हे स्वत: कोर्टात युक्तिवाद करणार असल्याने सर्वांचे लक्ष आजच्या सुनावणीकडे लागले आहे. त्यामुळे आजच्या सुनावणीत नक्की काय घडणार, हे पाहावे लागेल.
नेमकी घटना काय?
परभणीमध्ये 10 डिसेंबर 2024 रोजी स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करण्यात आली होती. या विटंबनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी 11 डिसेंबर रोजी परभणी जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान परभणीत जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यानंतर परभणी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन राबवत गुन्हे दाखल केले आणि त्यांना अटक केली. अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी या 35 वर्षीय तरूणाचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशीच्या शरीरावर अनेक जखमा असल्याने सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच सोमनाथचा मृत्यू झाल्याचा आरोप केला गेला. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूस जबाबदार धरून परभणी एलसीबीचे पोलिस निरीक्षक अशोक घोरबांड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी आंबेडकरी अनुयायांनी केली होती.
सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण झालीच नाही: देवेंद्र फडणवीस
सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांवर झालेले गंभीर आरोप फेटाळून लावले होते. सोमनाथ सूर्यवंशी (Somnath Suryavanshi) हे लॉचे शिक्षण घेत होते. ते मूळचे लातूर जिल्ह्यातील आहेत. ते हल्ली पुण्यात असतात आणि परभणीत शिक्षण घेत होते. त्यांच्यासंदर्भात वस्तुस्थिती अशी आहे की, परभणीत जळपोळीच्या व्हिडीओमध्ये जी मंडळ दिसत होती, त्यांना अटक करण्यात आली होती. यातच सूर्यवंशी यांनाही अटक करण्यात आली. त्यांना दोन वेळा मॅजिस्ट्रेटपुढे उभे करण्यात आले. मॅजिस्ट्रेटची ऑर्डर माझ्याकडे आहे. दोन्ही वेळा मॅजिस्ट्रेटने त्यांना पोलिसांनी तुम्हाला कुठल्या थर्ड डिग्रीचा वापर केलेला आहे का, पोलिसांनी तुम्हाला मारहाण झालेली आहे का? असं विचारलं. सोमनाथ सूर्यवंशी यांनी मला कुठलीही मारहाण झालेली नाही, असे सांगितलेले आहे. सोमनाथ सूर्यवंशी पोलीस कोठडीत असतानाचे व्हिडीओ फुटेज आपल्याकडे आहेत. हे व्हिडओ फुटेज अनएडिटेड आहेत. या पूर्ण व्हिडीओ फुटेजमध्ये सोमनाथ सूर्यवंशी यांना कुठेही मारहाण झाल्याचं दिसत नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्या शवविच्छेदनाच्या रिपोर्टचे पहिले पान सर्वांनी पाहिले आहे. या रिपोर्टनुसार सोमनाथ सूर्यवंशी यांना श्वसनाचा दुर्धर आजार आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंगावरील जुन्या जखमांचाही उल्लेख आहे. पोलीस कोठडीतून ते जेव्हा एमसीआरमध्ये गेले. तेव्हा सूर्यवंशी यांना जळजळ होत होतं. तक्रारीनंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यांना मृत घोषित करण्यात आले, असे फडणवीस यांनी म्हटले होते.
आणखी वाचा
























