Parbhani Accident News: स्कॉर्पिओ-दुचाकीची समोरासमोर धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू, चारचाकी जळून खाक
Parbhani News :
Parbhani Accident News परभणी : परभणीच्या पोखर्णी-पाथरी महामार्गावर (Pokharni-Pathri Highway) भीषण अपघात झाला आहे. सोनपेठ येथील पोलीस उपनिरीक्षक यांच्या दुचाकी आणि स्कॉर्पिओची समोरासमोर धडक झाली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला असून स्कॉर्पिओ जळून खाक झाली आहे.
प्रभाकर मारोतराव गवारे (56, रा. पाथरी) असे अपघातात ठार झालेल्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव आहे. सोनपेठ पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदावर प्रभाकर गवारे कार्यरत होते. रविवारी रात्री गवारे हे परभणी (Parbhani Accident News) येथून सोनपेठकडे दुचाकीने जात होते.
स्कॉर्पिओ-दुचाकीची समोरासमोर धडक
त्यानंतर भारसवाडा येथे समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओ क्रमांक (एम एच 12 एम एल 4750) आणि गवारे यांच्या दुचाकीची समोरासमोर धडक झाली. वाहनाच्या धडकेनंतर गवारे हे बाजूला फेकले गेले. यात ते गंभीर जखमी होऊन जागीच ठार झाले.
स्कॉर्पिओतील प्रवासी पसार
काही वेळाने दोन्ही वाहनांना आग लागली. आगीत दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. आग लागण्याअगोदरच घटनास्थळावरून स्कॉर्पिओ वाहनातील प्रवासी पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच दैठणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक बी.आर. बंदखडके, बळीराम मुंडे, विठ्ठल कुकडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मयत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर गवारे यांचा मृतदेह परभणी येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
गवारेंना काही महिन्यांपूर्वीच पदोन्नती
दरम्यान, प्रभाकर गवारे हे २०१९ साली सोनपेठ पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर रुजू झाले होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांची पोलीस उपनिरीक्षक म्हणून पदोन्नती झाली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भरधाव कारची दुचाकीला धडक
लातूर जिल्ह्यातील (Latur) एका तरुणाला लिफ्ट घेणे जीवावर बेतले. शेताकडून घरी परतण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट घेऊन निघालेल्या तरुणाचे अपघाती निधन (Death In Accident) झाले. पाठीमागून कारने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकी 40 ते 50 फुट लांब फरपटत गेली. या भीषण अपघातात लिफ्ट घेणाऱ्या तरुणाचा जागीच मृत्यू झाले. तर कारमधील दोन आणि दुचाकी वरील एक जण गंभीर जखमी झाले. गुरुवारी (दि. ११) ही घटना घडली.
इतर महत्वाच्या बातम्या