Parbhani : संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता परभणी प्रशासन अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आढावा बैठक
Parbhani News: जिल्हाधिकारी कार्यालयात गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्याची आढावा बैठक घेण्यात आली.
Parbhani News: अल निनोच्या समुद्र प्रवाहाची सक्रियता लक्षात घेता जिल्ह्यात आगामी काळात संभाव्य पाणीटंचाई जाणवू शकते. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील (Parbhani District) सर्व संबंधित यंत्रणेने संभाव्य पाणीटंचाई (Water Issues) निवारण विशेष कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. जेणेकरुन एकही गाव पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही याबाबत नियोजन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात गोयल यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता कृती आराखड्याची आढावा बैठक घेण्यात आली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार दक्षिण पॅसिफिक महासागरातील अल निनो या समुद्री प्रवाहाच्या सक्रियतेमुळे देशातील मान्सून पर्जन्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे जून 2023 नंतरही पिण्यासाठी पाणीटंचाई जाणवू शकते. पाणीटंचाई निवारणाच्या उपाययोजना राबविणे आवश्यक आहे. तसेच उन्हाळ्यात तीव्र उष्णतेच्या लाटा येण्याचा अंदाज असून, तीव्र उष्णतेमुळे स्त्रोतातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीसाठा झपाट्याने खालावू शकतो. त्यामुळे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आढावा बैठक बोलावली होती. यावेळी ग्रामीण तसेच शहरी भागासाठी विशेषत: पिण्याच्या पाण्यासाठी जलयुक्त शिवार, अटल भुजल योजना, पाऊस पाणी संकलन व कॅच द रेन पिण्याचे पाण्याचे स्त्रोतांचे बळकटीकरण या योजनेला अभियान स्वरुपात राबविण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी या बैठकीत दिले आहेत.
ग्रामीण भागातील उपाययोजनावर लक्ष ठेवा...
गतवर्षी जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला होता, त्यामुळे सद्यस्थितीत जलस्त्रोतांमध्ये मुबलक पाणीसाठा असून, जिल्ह्यात टँकरची आवश्यकता भासणार नाही. तरीही खबरदारीच्या उपाययोजना म्हणून जिल्हा प्रशासन विभागनिहाय उपाययोजना करणार आहे. पाण्याचे स्त्रोत, पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था, त्यांचे नियोजन, त्यावरील उपाययोजना, ग्रामीण भागातील हातपंप नादुरुस्त असल्यास ते दुरुस्त करण्याचे आदेश देताना कुपनलिका, विहिरीतून पाणीपुरवठा सुरळीत ठेवता येईल, याकडेही तितकेच लक्ष देण्याचे आदेश जिल्हाधिकारी गोयल यांनी दिले.
मागील 10 वर्षातील पाणीटंचाईचा आढावा
आगामी काळात लवकर पावसाळा सुरु न झाल्यास महानगरपालिका, नगर पालिका आणि ग्रामीण स्तरावर पाणीपुरवठा उपाययोजना करण्यामध्ये संबंधित यंत्रणेने तात्काळ कार्यवाही करावी. या उपाययोजना करताना वन्यप्राण्यांसाठी जंगलातील पाणवठ्यांमध्ये मुबलक पाणी राहील याचे नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खबरदारीच्या उपाययोजना म्हणून माहे जुलै ते ऑगस्ट 2023 पर्यंत नागरिकांसह वन्यप्राण्यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यासाठी पाणीटंचाई निवारण विशेष कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी विभागप्रमुखांना दिले. मागील 10 वर्षातील पाणीटंचाईचा आढावा घेऊन तशी काळजी घेण्याबाबत त्यांनी सांगितले.
सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचा आढावाही घेतला...
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची 65 गाव योजना, जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या स्त्रोतांमधील सद्यस्थितीतील पाणीसाठ्याचा आढावाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतला. तसेच शासनस्तरावर पाणीटंचाईबाबतचा पुन्हा पाठपुरावा होणार असून, पाणीटंचाईवर कायमस्वरुपी किंवा तात्पुरत्या स्वरुपात उपाययोजना असल्यास त्याची माहिती जिल्हा स्तरावरील यंत्रणेला देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, लघुपाट बंधारे विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा परिषदेच्यार संबंधित विभागाचे अधिकारी, गटविकास अधिकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या :