(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Lumpy Skin Disease : लम्पीचं संकट पाहता यंदा पोळा साधेपणानेच साजरा करा; परभणी जिल्हा प्रशासनाचे आवाहन
Lumpy : लम्पी आजाराचे सावट असल्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी हा सण आपल्या घरीच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.
परभणी : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये सध्या लम्पी (Lumpy) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे या विषाणूजन्य रोगापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी पोळा सणानिमित्त बैल, गोऱ्हे यांना गावात एकत्र आणू नये. त्यामुळे यंदा पोळा साधेपणानेच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रघुनाथ गावडे यांनी केले आहे. त्यामुळे यंदाचा पोळा साधेपणाने साजरा होण्याची शक्यता आहे.
प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोग प्रतिबंधक व नियंत्रण अधिनियम 2009 नुसार परभणी जिल्हा नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित आला आहे. हा आदेश जिल्ह्यात 23 ऑगस्टपासून लागू करण्यात आला असून, त्यामुळे या आदेशान्वये जनावरांच्या आठवडी बाजारात आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतुकीस प्रतिबंध तसेच गोवंशिय जनावरांचे एकत्रित मेळावे, प्रदर्शन, शर्यती आयोजित करण्यास प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. त्यात पोळा सण तोंडावर आला असून, जिल्ह्यात पोळ्याचा सण मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात साजरा केला जातो.
परंतु, या वर्षी सद्यस्थितीत लम्पी आजाराचा प्रादुर्भाव जिल्ह्यात आहे. त्यामुळे बाधित जनावरांपासून संसर्ग होवून चांगली, सुदृढ जनावरांना बाधा होऊ नये किंवा एकत्रित सार्वजनिक ठिकणी आणू नयेत. बाधित जनावरांचे विलगीकरण करावे. या वर्षी प्राण्यांवर या आजाराचे सावट असल्यामुळे शेतकरी, पशुपालकांनी हा सण आपल्या घरीच अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. पी. पी. नेमाडे व जिल्हा पशुसंर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या उत्साहात पोळा सण साजरा करणाऱ्या शेतकऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यात लम्पीचा कहर
एकीकडे परभणी जिल्ह्यात अशी परिस्थिती असताना तिकडे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात लम्पीचा कहर पाहायला मिळत आहे. गत दोन महिन्यांपासून तालुक्यात लम्पीची तीव्रता वाढली आहे. मागील दीड महिन्यांपासून तालुक्यात लम्पीच्या आजाराने जनावरे बाधित होत आहेत. सध्या तालुक्यात लम्पी आजाराची 68 जनावरे आढळून आली आहेत. या जनावरांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर 1 एप्रिलपासून आतापर्यंत तालुक्यात लम्पीच्या आजाराने 28 जनावरे दगावली आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील कळमनुरी पशुवैद्यकीय दवाखान्यांतर्गत येणाऱ्या गावांमध्ये 68 जनावरे लम्पी आजाराने बाधित झाली आहेत. त्यामुळे पशुपालन करणाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या: