Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुकीत अजित पवार कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील; बावनकुळेंचं वक्तव्य
Parbhani News : भाजपकडून घर चलो अभियान राबवले जात असून, या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते.
Chandrashekhar Bawankule On Ajit Pawar : शिवसेनेते झालेल्या बंडखोरी नंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर राष्ट्रवादीत सुद्धा अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदेच्या पाऊलावर पाऊल ठेवत बंडखोरी करत भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, आता शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजप सोबत असून, आगामी निवडणूक देखील तीनही पक्ष एकत्रच लढवणार असल्याचे दावे केले जात आहेत. अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी एक महत्वाचं वक्तव्य केले आहे. आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील, असे वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी (29 जुलै) परभणीच्या पाथरीतील एका सभेत केले असल्याचे वृत्त 'लोकमत'ने दिले आहे.
भाजपकडून घर चलो अभियान राबवले जात असून, या निमित्ताने प्रदेशाध्यक्ष बावनकुळे शनिवारी पाथरी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांशी भेट घेत संवाद साधला. दरम्यान, यावेळी त्यांची सभा देखील झाली. ज्यात त्यांनी पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले. ज्यात बोलताना ते म्हणाले की, “बदलत्या राजकीय गणितात आता भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीची महायुती आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या निवडणुकांमध्ये आपणही घड्याळ चिन्हाचा प्रचार करणार आहोत. भाजपला दिलेले मत विकासरुपाने परतफेड करण्याचा भाजपचा संस्कार आहे. तर आगामी 2024 च्या निवडणुकांमध्ये अजित पवार हे देखील कमळाचे बटन दाबा म्हणत प्रचार करतील. मागील नऊ वर्षांत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकोपयोगी केलेली कामे पाथरी मतदारसंघातील 60 हजार घरांत कार्यकत्यांनी पोहोचवावे,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
संभाजी भिडे याचं वक्तव्य तपासले पाहिजे...
संभाजी भिडे भाजपाचं पिल्लू असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यांच्या टीकेला बावनकुळे यांनी उत्तर दिले आहे. “नाना पटोले यांनी जरा अभ्यास करुन बोलले पाहिजे. भिडे हे स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. भारतीय जनता पार्टीचे ते कोणतेही सदस्य नाहीत. तसेच पक्षाच्या कोणत्याही पदावर ते नाहीत. त्यामुळे त्यांचा संबध भाजपसोबत जोडणे योग्य नाही. राहिला विषय भिडे यांनी केलेल्या वक्तव्याचा, तर अशा वक्तव्याची चौकशी करण्याची जबाबदारी सरकारची असते. त्यामुळे चौकशी करुन त्याबाबत सरकार विचार करेल. तर वादग्रस्त टिप्पणी करायला नको हवी, जर अशी वादग्रस्त टिपणी केली असेल तर योग्य कारवाई झाली पाहिजे. किंवा या वक्तव्यात काय चुकीचे आहे हे तपासले पाहिजे” असे बावनकुळे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: