बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे झाले असते : विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
परभणी : देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी (Dr. Babasaheb Ambedkar) मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या मंदिराची देखरेख न करता हे पुजारी पळून जातील असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी परभणीत (Parbhani) केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहाफुटी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, थायलंड येथील भिक्खू गगन मलिक यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी मूर्ती वितरण झाल्यानंतर बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. तर, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौध्द धर्म स्वीकारण्यावरून वक्तव्य केले. जर, "डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. एवढंच नाही तर त्यांनी थेट मंदिरातील पुजाऱ्यांनाही लक्ष केले. मंदिरातील दान पेट्या काढून घेतल्यास, मंदिरात असलेले पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेख ही करणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला...
परभणी जिल्ह्यातील पुढील पाणीटंचाई लक्षात घेता आतापासूनच जिल्हाभरातील पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे निर्देश विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या दुष्काळ आढावा बैठकीत दिले. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे रविवारी परभणी दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह जिल्हाभरातील वेगवेगळ्या विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
आमच्या हक्कासाठी आमची भूमिका मांडतोय.
परभणी दौऱ्यावर असलेल्या विजय वडेट्टीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, भाजप नेते मंत्री छगन भुजबळ यांना ओबीसी सभा घेण्यास ब्लॅकमेल करताय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देतांना वडेट्टीवार म्हणाले की, "मला याबाबत संशय आहे, पूर्ण खात्री करून मी यावर बोलेल. तसेच, मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या समाजाची भूमिका मांडतायेत आणि आम्ही आमच्या हक्कासाठी आमची भूमिका मांडतोय. कुठेही द्वेष पसरवण्याबाबत आम्ही कुणाचेही समर्थन करत नाहीत. सर्वांनी एकमेकांचा आदर करावा. महाराष्ट्र हा फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या:
'सोबत सभा घेतली, पण भुजबळांची भूमिका मान्य नाही'; विजय वडेट्टीवारांचं मोठं वक्तव्य