परभणी प्रकरणाची अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडून गंभीर दखल; उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचे सक्त निर्देश
Parbhani Violence: परभणीच्या घटनेची आता महाराष्ट्र अनुसूचित जाती- जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. परभणीच्या घटनेची वस्तुस्थिती आणि घटनेला अहवाल सादर करा, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत.
Parbhani Violence परभणी: परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची तोडफोड झाल्यानंतर पुकारण्यात आलेल्या बंद आंदोलनाला काल हिंसक वळण लागले होते. आंदोलकांचा मोठा जमाव, दगडफेक, जाळपोळ, पोलिसांचा आंदोलकांवर सौम्य लाठीचार्ज, जमावबंदी, इंटरनेट सेवा बंद अशा ताणलेल्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकूण 8 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, आतापर्यंत 50 जणांना अटक करण्यात आली आहे. परभणीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर आयजी शहाजी उमाप यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अटक करण्यात आलेल्यांमध्ये 41 पुरुष आणि 9 महिलांचा समावेश आहे. प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणताना धरपकड केली असून, रात्री कोम्बिंग ऑपरेशन केले गेले नाही. असंही परभणीचे आयजी शहाजी उमाप यांनी सांगितलं.
दरम्यान, परभणीच्या घटनेची आता महाराष्ट्र अनुसूचित जाती - जमाती आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. परभणीच्या घटनेची वस्तुस्थिती आणि घटनेला अहवाल सादर करा, अशा सूचना देखील करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती - जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांचं परभणी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांना त्या संदर्भात पत्र पाठविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. परभणीत सामाजिक सलोखा बिघडू नये, यासाठी ठोस पावलं उचलण्याच्या ही सूचना त्यांनी केल्या आहेत.
चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे सादर करा
महाराष्ट्र अनुसूचित जाती- जमाती आयोग लवकरंच परभणीचा दौरा करणार आहे.परभणी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील संविधानाच्या प्रतिकृतीला बाधा पोहचविल्याच्या घटनेबाबत महाराष्ट्र अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एड. धर्मपाल मेश्राम यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच या घटनेची सखोल चौकशी करुन वस्तुनिष्ठ तपशीलवार अहवाल आयोगाकडे तत्काळ सादर करण्याचे निर्देश ही त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
तोडफोड करणाऱ्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा
परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ आंबेडकरी विचारांच्या संघटनाच्या वतीने धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरात बंद पाळण्यात आला. परभणीत शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या बंद दरम्यान हिंसाचार घडला, या मागच्या मास्टर माईंडचा शोध घेऊन त्याला अटक करावी. अशी मागणी यावेळी आंदोलकानी केली. तसेच संविधान शिल्पाची तोडफोड करणाऱ्या वर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी ही मागणी करण्यात आली. परभणीत आंबेडकरी जनतेविरोधात पोलीस दडपशाही करत आहेत त्यालाही लगाम घालावं असं निवेदने यावेळी देण्यात आले. कळंबमध्ये निषेध आंदोलनाच्या सुरुवातीला आंदोलकांच्या वतीने संविधानाची सामूहिक शपथ घेण्यात आली. त्यानंतर शहरांमध्ये निषेध रॅली काढत बंदच आवाहन करण्यात आलं. आंबेडकरी विचारांच्या संघटनांनी पुकारलेले या बंदला उस्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
हे ही वाचा