Palghar : पालघर लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचाच उमेदवार, राजेंद्र गावित हे धनुष्यबाणावरच लढतील; श्रीकांत शिंदे यांचा दावा
Palghar Lok Sabha : गेल्या वेळी भाजपच्या राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावरून निवडणूक लढवली होती आणि ते जिंकले होते. आता या जागेवरून पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ असणार आहे.
Palghar Lok Sabha : पालघर लोकसभेच्या निवडणुकीत (Palghar Lok Sabha) महायुतीचे पुढील उमेदवार हे राजेंद्र गावितच असणार असून ते धनुष्यबाणावरच लढतील असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला. शिवसेनेचे राजेंद्र गावित हे पालघरचे खासदार असून या जागेवर भाजपनेही दावा केल्याची चर्चा आहे.
गेल्या वेळी म्हणजे 2019 ची लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे राजेंद्र गावित यांनी बाजी मारली. 2018 मध्ये खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी सन 2018 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने राजेंद्र गावित यांना काँग्रेस पक्षातून आयात केले होते. राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश केला होता. जागा वाटपात ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यानंतर गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
त्यामुळे यावेळच्या निवडणुकीत भाजपने पालघरवर दावा केल्याची माहिती समोर येत आहे. ही जागा भाजपने आपल्याकडे ठेवण्याची तयारी सुरू केली असून सध्याचे शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावित यांना भाजपच्या तिकीटावर लोकसभेत पाठवण्याचीही तयारी असल्याची माहिती समोर येत आहे.
राजेंद्र गावित हे धनुष्यबाणावरच लढणार
महायुतीतील भाजपच्या या दाव्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडूनही या मतदारसंघावर दावा करण्यात आला आहे. राजेंद्र गावित हे गेल्या वेळच्या निवडणुकीत शिवसेनेच्या चिन्हावर निवडून आले होते, त्यामुळे या मतदारसंघावर सेनेचाच दावा असल्याचं सांगितलं जातंय. तसेच या ठिकाणी राजेंद्र गावितच शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढवतील असंही खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
2019 सालच्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांची बाजी
2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजपचे उमेदवार राजेंद्र गावित यांना एकूण झालेल्या मतदानाच्या 48.30 टक्के अर्थात 5 लाख 15 हजार मते मिळाली होती. तर, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव यांना 46.90 टक्के अर्थात 4 लाख 91 हजार 596 मते मिळाली. गावित यांनी 23 हजार 404 मतांनी विजय मिळवला. बहुजन विकास आघाडीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने पाठिंबा दिला होता.
ही बातमी वाचा :