(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar News : डोलीतून नेत असताना महिलेची रस्त्यातच प्रसुती, पालघरमधील जव्हार भागातील घटना
Palghar News Update : जव्हार भागात डोलीतून नेत असताना गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. जव्हार मोखाडा भागात अशा घटना वारंवार समोर येत आहेत.
Palghar News : पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा भागात डोलीतून नेत असताना गरोदर महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. माता आणि बाळ दोघेही सध्या सुखरुप आहेत. परंतु, देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली तरी देशातील अनेक भागात नागरिकांना एवढ्या भयानक परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. यावरुन नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या उदाहरणावरुन जव्हार भागातील नागरी समस्या संपता संपेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मर्कटवाडी पालघर या भागातील गरोदर महिलांचे झालेले भीषण वास्तव समोर असताना आता जव्हार तालुक्यातील ऐना मधील हे भयानक वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
मनमोहाडी या गावातील अंजली राजेश पारधी या महिलेला पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास प्रसुती वेदना चालू झाल्या. जवळपास कोठेच रुग्णालय नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि गावातील नागरिकांनी तिला पाच किलोमीटर डोलीतून रुग्णालात घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, डोली घेऊन चालत जात असताना रस्त्यातच तिची प्रसुती झाली. त्यानंतर पहाटेच मातेला आणि बाळाला जव्हार कुटीर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले.
पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा हा भाग आदिवासी भाग असून अतिशय दुर्गम असा आहे. या गावात जाण्या येण्यासाठी रस्ताच नाही. झाप गावापासून 4 ते 5 किलोमीटर पायी प्रवास करावा लागतो. एवढेच नाही तर या प्रवासात डोंगर चढउतार करुन डोंगरातून वाट काढत या भागात जावे लागते. यातच प्रवासाचे कोणतेच साधन वेळेत मिळत नसून मिळेल त्या साधनाचा वापर करुन रुग्णाला रुग्णालयात पोहोचवावे लागते. त्यातूनही रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचला नाही तर एखाद्यावेळी दुर्देवी घटनांना सामोरे जावे लागते.
मोखाडा भागात अशा घटना वारंवार समोर येत आहेत. परंतु, एखादी घटना घडते, दोन तीन दिवस चर्चा होते. त्या नंतर परिस्थिती जैसे थे असते. मोखाडा भागातील या भयानक परिस्थितीकडे कोणीच गांभीर्याने पाहात नाहीत. अधिकारी, लोकप्रतिनिधी एक दिवस येतात आश्वासने देतात आणि नंतर गायब होतात. ठोस अशा उपाययोजना न करता या समस्यांवर मार्ग काढला जात नाही. यामुळे नागरिकांना नाहक जीवही गमवावा लागतो. अपुऱ्या सुविधांमुळे यापूर्वी देखील अनेकांना जीव गमवावा लागला आहे. 15 ऑगस्ट दिवशी देखील अशीच एक मन हेलावून टाकणारी घटना घडली होती.
15 ऑगस्ट रोजी देशभरात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना मोखाड्यातील अतिदुर्गम बोटोशी ग्रामपंचायतीतील मरकटवाडी येथील गर्भवती महिलेस आरोग्य सेवा ऊपलब्ध न झाल्याने तिच्या जुळ्या बालकांचा डोळ्यादेखत मृत्यू पहावा लागला. महिलेला आरोग्य सेवा मिळविण्यासाठी कुटुंबीयांना आणि गावकऱ्यांना तीन किलोमीटर डोलीतून पायपीट करावी लागल्याची लागली. परंतु, तिच्या जुळ्या बाळांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता.