Palghar News : मुसळधार पावसातही मासेमारीसाठी समुद्रात गेले आणि दोन मच्छिमारांनी जीव गमावला
Palghar Rains : जोरदार पाऊस, त्यात समुद्र खवळलेला, अशा वातावरणात निसर्गाला आव्हान देत पालघरमधील दोन मच्छिमार मासे पकडण्यासाठी गेले आणि त्यांनी जीव गमावला.
Palghar Rains : पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस असतानाही मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्या दोन मच्छिमारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोपाळ मडवे आणि वसंत राऊत अशी मृत मच्छिमारांची नावं आहेत. आज पहाटे त्यांचे मृतदेह समुद्रकिनारी आढळून आले. हे दोघेही डहाणूतील बहाड इथले रहिवासी होते.
पालघरमध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच पश्चिम किनारपट्टी भागात वादळीच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु असल्याने समुद्रही खवळला होता. अशातच डहाणू तालुक्यातील बहाड इथले दोघे जण काल (11 जुलै) मच्छी पकडण्यासाठी समुद्रात गेले होते. मात्र दोघेही घरी परत न असल्याने त्यांची शोधाशोध सुरु झाली. अखेर आज पहाटे म्हणजे 12 तासानंतर या दोन्ही मच्छिमारांचे मृतदेह समुद्रकिनारी आढळून आले आहेत.
पालघरमध्ये काल देखील वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु होता. याच वादळाच्या तडाख्यात आल्याने दोन्ही मच्छिमारांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. जोरदार पाऊस, त्यात समुद्र खवळलेला, अशा वातावरणात निसर्गाला आव्हान देत हे मच्छिमार मासे पकडण्यासाठी गेले आणि त्यांनी जीव गमावला.
पालघरमध्ये पावसाची रिपरिप सुरुच
पालघर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असून याचाच परिणाम म्हणून जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वहायला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यातील सूर्या, वैतरणा, पिंजाळ या प्रमुख नद्यांना मोठा पूर आला असून त्या दुथडी भरुन वाहायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून ही पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट दिला आहे. जिल्ह्यातील धरणांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील पाणी प्रश्न सुटणार असून शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.
इतर बातम्या