गरोदर मातांसाठीच्या बाईक ॲम्बुलन्स वापराविना पडून, पालघरमधील आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर
Palghar News Update : पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाड्याच्या दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेल्या बाईक ॲम्बुलन्स धुळखात पडल्या असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय.
पालघर : जव्हार मोखाडा मधील दुर्गम भागातील गावपाड्यांना जोडणारे मुख्य रस्ते नसल्याने रुग्ण आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. मर्कटवाडी आणि इतर घटनेनंतर पुन्हा एकदा एका महिलेला प्रसूतीसाठी झोळीतून आणत असताना तिची प्रसूती वाटेतच झाली. मात्र वेळेत रुग्णांना उपचार मिळावे यासाठी रोटरी क्लब आणि सामाजिक संस्थांनी लाखो रुपये खर्च करून या भागासाठी दिलेल्या बाईक ॲम्बुलन्स मागील आठ ते नऊ महिन्यांपासून जव्हारच्या कुटीर रुग्णालय परिसरात धुळखात पडून आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
जव्हार मोखाड्याच्या दुर्गम भागातील रुग्णांना रुग्णालयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेल्या बाईक ॲम्बुलन्स धुळखात पडल्या असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. जव्हार मोखाड्यातील अनेक भागात चार चाकी वाहन तसेच ॲम्बुलन्स जाऊ शकत नसल्याने अनेक रुग्णांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. चालू वर्षी प्रमाणेच मागील वर्षी देखील अशा अनेक घटना समोर आल्यानंतर रोटरी क्लब आणि काही संस्थांनी लाखो रुपये खर्च करून या भागासाठी दोन बाईक ॲम्बुलन्स दिल्या आह. या बाईक ॲम्बुलन्स सहज पायवाटेने जाऊ शकत असल्याने याची मोठी मदत येथील दुर्गम भागातील रुग्णांना होईल अशी अपेक्षा या संस्थांना होती. मात्र आरोग्य विभागाच्या भोंगळ कारभाराचा फटका या बाईक ॲम्बुलन्सलाही बसला असून या बाईक ॲम्बुलन्स सध्या जव्हार कुटीर रुग्णालयाच्या परिसरात मागील आठ ते नऊ महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत.
मागील आठ ते नऊ महिन्यांपासून या दोन बाईक ॲम्बुलन्स जव्हार कुटीर रुग्णालयाच्या परिसरात अडगळीत पडलेल्या असून ऊन आणि पाऊस यामुळे या बाईक एम्ब्युलन्सला सध्या गंज लागण्यास सुरुवात झाली आहे.या ॲम्बुलन्सचा योग्य वापर करून येथील रुग्णांना आणि नागरिकांना त्याचा लाभ द्यावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे. या बाईक ॲम्बुलन्स प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या असून जागा उपलब्ध असल्याने कुटीर रुग्णालयाच्या परिसरात उभ्या असल्याचा दावा जव्हार कुटीर रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक रामदास मराड यांनी केला आहे.
जव्हार मोखाडा या भागात दळणवळणाच्या सुविधांचा अभाव आणि आरोग्य विभागाचा उडालेला बोजवारा यामुळे अनेक रुग्णांना रुग्णालयात पोहोचण्यासाठी मोठी गैरसोय होते. त्यातच शासनाकडून अनेक उपाययोजनाही राबवल्या जातात. मात्र जी साधनसामग्री जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध आहे, त्याचा योग्य वापर करताना पालघर जिल्हा प्रशासन अपयशी ठरताना दिसून येतंय.