(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Palghar Accident : सायरस मिस्त्रींचा अपघात झालेल्या ठिकाणी पुन्हा अपघात; सीट बेल्ट लावल्याने तिघे बचावले
Palghar Accident : मुंबई-अहमदाबाद मार्गावर आज सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने त्यांना फारशी दुखापत झाली नाही.
Palghar Accident : उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या कारचा झालेल्या अपघाताच्या ठिकाणी पुन्हा एकदा अपघात झाला आहे. मात्र, सुदैवाने या अपघातात कारमधील प्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. प्रवाशांनी सीट बेल्ट लावलेले असले तरीही चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. या मार्गावर अपघाताच्यादृष्टीने 29 ब्लॅक स्पॉट निश्चित केले आहेत. यापैकी काही ब्लॅक स्पॉटच्या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाने उपाययोजना केल्या असल्या तरीही त्या उपाययोजना अजूनही तोकड्या पडत असल्याचे चित्र आहे.
या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी जवळील सूर्या नदीच्या पुलाला धडकून सायरस मिस्त्री यांच्या कारचा भीषण अपघात झाला होता यामध्ये सायरस मिस्त्री यांच्यासह त्यांच्या एका सहकाऱ्याचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले होते. आज पुन्हा याच ठिकाणी एका कारचा गुजरातहून मुंबईकडे जाताना कठड्याला जोरदार धडकून अपघात झाला. सुदैवाने या कार मधील तिन्ही प्रवाशांनी सीट बेल्ट लावले होते. कारने कठड्याला जोराने धडक दिली असली तरी प्रवाशी किरकोळ जखमी झाले आहेत.
याच ठिकाणी सायरस मिस्त्री यांच्या कार अपघातानंतर क्रॅश कुसन बसवण्यात आलं होतं आणि इतर उपाययोजना करण्यात आल्या होत्या. मात्र चारोटीचा उड्डाणपूल उतरताच तीन लेनचे दोन लेनमध्ये रूपांतर होत असल्याने पुलावरून अति वेगाने येणाऱ्या चालकाला पुढचा रस्ता समजत नाही. अचानक दोन लेन झाल्याने येथे वारंवार अपघात घडत आहेत. मात्र ज्या पद्धतीच्या ठोस उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या पद्धतीच्या उपाययोजना अजूनही केल्या गेलेल्या नाहीत, असे म्हटले जात आहे. या धोकादायक ठिकाणी वारंवार अपघात घडत आहेत. तसाच हा कार अपघात घडला असला तरी सुदैवाने या कार मध्ये प्रवास करणाऱ्या तिघांनाही कोणताही धोका पोहोचलेला नाही. मात्र कारच मोठ्या प्रमाणात नुकसान झाल आहे. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गावर अच्छाड ते घोडबंदर पर्यंत जेवढे ब्लॅक स्पॉट आहेत ते कायमस्वरूपी दुरुस्त करण्यात यावेत अशी मागणी आता जोर धरू लागले आहे.
अपघातात कार चक्काचूर, सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील पालघरमधील धानिवरी परिसरात भीषण 25 मार्च रोजी भीषण अपघात घडला. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रसिद्ध उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या झालेल्या अपघाती मृत्यू ठिकाणाहून काही अंतरावर धानिवरी येथे फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात कारचा चक्काचूर मात्र सीट बेल्ट लावल्याने पाचही प्रवासी सुखरूप बचावले आहेत.
विमल मैतालिया हे उद्योगपती आपल्या कारचालक आणि परिवारासह सिल्वासाहून मुंबईकडे जात असताना धानिवरी येथे हा भीषण अपघात घडला. चालकाचे भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही फॉर्च्युनर थेट पुढे चाललेल्या कंटेनरवर धडकली. हा अपघात इतका भीषण होता की, या अपघातात फॉर्च्युनर गाडी अर्धी कापली गेली तसंच या भरधाव कारने अपघातानंतर तीन ते चार पलटी देखील खाल्ल्या. मात्र या कारमधील कार चालकासह सहप्रवाशांनी सीट बेल्ट लावले असल्याने या कारमधील कोणालाही किरकोळ दुखापत सुद्धा झाली नाही.