Maharashtra Gujarat Border Dispute : गुजरातचा महाराष्ट्रातील गावांवर दावा; दीड किमी घुसखोरी करत बेकायदा पथदिवे लावले
Maharashtra Gujarat Border Dispute : महाराष्ट्रातील गावांवर गुजरातमधील ग्रामपंचायतींनी दावा केला आहे. वेवजी गावात गुजरातच्या ग्रामपंचायतीने दीड किमी घुसखोरी करत बेकायदापणे पथदिव लावले आहेत.
Palghar Talasari News : दक्षिणेत बेळगाव प्रमाणेच उत्तरेत गुजरात (Gujarat) आणि महाराष्ट्र (Maharashtra) सीमावादाचा (Border Dispute) मुद्दा पुढे येत आहे. तलासरी तालुक्यातील गुजरातच्या सीमेवर असलेल्या काही गावांमध्ये गुजरातच्या ग्रामपंचायतीने घुसखोरी केली असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील गावांवर, भूभागावर गुजरात दावा सांगत असल्याचा मुद्दा डहाणूचे आमदार विनोद निकोले (MLA Vinod Nikole) यांनी लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर वेवजी गावात गुजरातच्या ग्रामपंचायतीने काम केले असल्याचे समोर आले आहे.
गुजरातच्या सोलसुंबा ग्रामपंचायतीने बेकायदा पथदिवे लावून घुसखोरी केल्याच्या प्रकारावरून महाराष्ट्रातील वेवजी ग्रामस्थांनी विरोध सुरू केल्यामुळे हा सीमावाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या सीमा भागातील अनेक व्यवहार दोन्ही राज्यांच्या सीमेवरील गावांवर चालतात.
उंबरगाव येथील सोलसुंभा ग्रामपंचायतीने महाराष्ट्रातील वेवजी ग्रामपंचायत हद्दीत दीड किलोमीटर आत घुसखोरी केल्याने सीमावाद अद्याप चिघळत आहे. दोन राज्यांतील सीमा सुस्पष्ट व्हावी, त्यामध्ये सुसूत्रता यावी, दोन राज्यांच्या सीमेवर नागरिकांना विनातक्रार प्रवास करता यावा, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आदानप्रदान टिकवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या सीमेवरील ग्रामपंचायती आणि प्रशासनाने एकत्र येऊन हा रेंगाळलेला प्रश्न तात्काळ मार्गी लावणे गरजेचं झालं आहे.
तलासरी तालुक्यातील वेवजी आणि सोलसुंबा या गावांतून काही तक्रारी प्राप्त झाल्यानंतर हा मुद्दा विधानसभेपर्यंत पोहचला आणि तातडीनं प्रशासकीय चक्र फिरली. मात्र हा मुद्दा अधिक विकोपाला जाण्यापूर्वीच सरकारनं हा मुद्दा सामंजस्यानं सोडवायला हवा असे म्हटले जात आहे.
महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली. मात्र काही पालघर जिल्ह्यातील तलासरीत वसलेल्या काही भांगात महाराष्ट्र-गुजरात राज्याचं अद्याप योग्य पद्धतीनं सीमांकन करण्यात प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे काही मुद्यांवर हा सीमावाद समोर येऊ लागलाय.
प्रशासकीय अनास्थेमुळे इथल्या नागरिकांना वादाच्या प्रसंगाला तोंड द्यावं लागत आहे. यामुळे सीमालगतच्या वेवजी, तलासरी, गिरगाव, गिमाणिया, झाई, आच्छाड, संभा तर गुजरात राज्यातील सोलसुंबा, उंबरगाव येथील नागरिकांमध्ये सुसंवाद व व्यवहारात अडथळा निर्माण होत आहे. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच आरोग्य सेवांसाठी मुभा मिळावी यासाठी दोन्ही राज्यांनी एकत्र येऊन हा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं असल्याचे सांगितले जात आहे.
उंबरगाव शहराच्या जवळ तसेच वेवजी ग्रामपंचायतीच्या लगतच्या भागामध्ये दोन राज्यांमधील सीमेबाबत अस्पष्टता आहे. तसेच बोर्डी येथून तलासरीकडे जाताना गुजरात राज्यातून प्रवास करावा लागतो. उंबरगाव रेल्वे स्थानक गाठताना महाराष्ट्रातील नागरिकांना गुजरातमध्ये जावे लागते. त्यामुळे दोन्ही राज्यांच्या सीमेवरून नेहमी वादाचे प्रसंग उभे राहत असतात.
स्थानिकांना अतिक्रमणाचा त्रास
गुजरात राज्याची हद्द सुरु अशा आशयाचा बोर्ड असलेल्या जागेपासून अवघ्या पाचशे मीटर आधीपासून हे स्ट्रीट लाईट बसवण्यात आले होते. त्यामुळे कोरोना काळामध्ये राज्याच्या सीमा बंद असताना देखील याचा मोठा फटका येथील स्थानिकांना बसल्याचं सांगण्यात येत आहे. तर सध्या या भागाचे सीमांकन निश्चित नसल्याने हा वाद आणखी चिघळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये दाद मागण्याचा निर्णय वेवजी ग्रामपंचायतीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान वेवजी ग्रामपंचायतीकडून सोलसुंबा गावाला देण्यात आलेली परवानगी रद्द करण्यात आल्याचं ग्रामविकास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. तसेच शासनाला या भागातील सीमांकन करण्यासाठी पत्र देण्यात आलं असून पुढील गोष्टींचा पाठपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली आहे.