Tuljapur : थेट दर्शनाच्या नावाखाली पैसे घेतले, पण दर्शन नाहीच; जाब विचारताच तुळजापुरात पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण, गाड्याही फोडल्या
Tulja Bhavani Temple : तुळजापुरात घाटशिळ रोड वाहनतळावर थेट दर्शनच्या नावाखाली भाविकांना फसवण्याचे प्रकार सतत सुरू असून मंदिर समिती याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविक करत आहेत.
धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात (Tulja Bhavani Temple) भाविकांना पुजाऱ्याकडून बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. पुजारी आणि त्यांच्या साथीदारांनी भाविकांच्या गाडीची तोडफोड केली. आई तुळजाभवानीच्या दरबारातच पुजारी आणि एजंटानी धुडगूस घातल्याने एकच खळबळ उडाली आहे. नाशिकचे राजेंद्र नरहारी पिंगटे हे आपले कुटुंबीयसह तुळजाभवानीच्या दर्शनाला आले असता त्यांच्या सोबत हा प्रकार घडला. या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात एका पुजाऱ्यांसह पाच लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थेट दर्शनाच्या नावाखाली भाविकांकडून पैसे घेऊन दर्शन झाले नसल्याने भाविकाकडून विचारणा करताच पुजाऱ्यांनी त्यांना मारहाण केल्याची घटना घडलीय. पुजाऱ्यांनी भाविकांना बेदम मारहाण करून त्यांच्या चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्याची घटना तीर्थक्षेत्र तुळजापुरात घडली आहे.
एजंटने पैसे घेतले आणि पळ काढला
नाशिक येथील भाविक कुटुंबीयांसह तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी आले असता घाटशीळ रोडवर एका एजंटाने त्यांना 751 रूपयांत डायरेक्ट दर्शन देण्याचे आमिष दाखवले. तो एजंट त्यांना मंदिरात घेऊन गेला आणि दर्शन रांगेत ऊभे केले. नंतर त्या एजंटने पळ काढला.
जाब विचारल्यानंतर मारहाण
दर्शन झाल्यानंतर ज्यांचा मोबाइल क्रमांक दिला होता, तो पुजारी आलाच नसल्याचं पिंगटे कुटुंबाच्या लक्षात आलं. एका तासाच्या प्रतीक्षेनंतर दुसऱ्याच पुजाऱ्याने आरती करून मुखदर्शन घेऊन दिले. नंतर त्या भाविकांनी एजंटाला विचारणा केली असता एंजटाकडून भाविकांस मारहाण करण्यात आली. सोबतच्या महिलांनाही छेडले, मुलांच्या डोक्यात खोऱ्या, पाटी घातली. या मारहाणीत भाविकांचे दागिनेही चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. पाच-सहा जणांनी बेदम मारहाण करून भाविकांच्या इर्टिगा (क्र. एम एच 15 इ पी 6458) कारच्या काचा फोडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले.
तुळजापुरात घाटशिळ रोड वाहनतळावर थेट दर्शनच्या नावाखाली भाविकांना फसवण्याचे प्रकार सतत सुरू असून मंदिर समिती याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भाविक करत आहेत.
हा प्रकार मंदिराबाहेरील घाटशिळ रोड पार्किंगमध्ये घडला असल्याने पोलीस यात कारवाई करतील अशी भूमिका मंदिर समितीने घेतली आहे. तर मंदिर समिती ही स्थानिक पुजाऱ्यांच्या दहशतीखाली असल्याचं या प्रकाराने उघड झालं आहे.
तुळजापुरात या आधीही असे काही प्रकार घडले असूनही त्यावर काहीही ठोस कारवाई होत नसल्याने भाविकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
ही बातमी वाचा: