Tanaji Sawant on Maratha Reservation : "सत्तांतर होताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का?"; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची जीभ घसरली
Tanaji Sawant on Maratha Reservation : काही दिवसांपूर्वी हाफकिनसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत आलेले आरोग्यमंत्री तानाजी सावंत आता मराठा आरक्षणावरील वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत.
Tanaji Sawant on Aarakshan : वेगवेगळ्या मुद्यावरून चर्चेत असलेले आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरून केलेल्या वक्तव्यानं वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. आताच विरोधकांना मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असा सवाल तानाजी सावंत यांनी केला आहे. या सरकारच्या काळात मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation News) विषय अत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, असं सावंत यांनी म्हटलं आहे. आरक्षणावरून राष्ट्रवादीनं (NCP) दुटप्पी भूमिका घेतल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
उस्मनाबाद (Osmanabad) येथील कार्यकर्ता मेळाव्यात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणावरून राष्ट्रवादीवर टीका केली आहे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषय का आठवला? वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (National Congress Party) निशाणा साधला आहे.
आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? : तानाजी सावंत
आरोग्यमंत्री तानाजी सावंत मेळाव्यात बोलताना म्हणाले की, "यापूर्वी दुट्टपी राजकारणात मराठा आरक्षण अडकलं होतं. मात्र आमच्या सत्तेच्या कार्यकाळात मराठा समाजाला आरक्षण मिळणारच." मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच बाहेर काढून वातावरण खराब करणाऱ्यांना ओळखलं पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे सवालही यावेळी बोलताना सावंत यांनी उपस्थित केले आहेत.
उस्मानाबाद येथील कार्यकर्ता मेळाव्यात तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासाठी राष्ट्रवादीची दुटप्पी भूमिका कशी होती हे सांगितलं. "भाजप शिवसेनेची सत्ता असताना मराठा आरक्षणाचा विषय काढत सातत्यानं देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यात आले होते. मात्र देवेंद्र फडणीस यांनीच मराठा आरक्षणाचा विषय मार्गी लावला होता. 2019 च्या नंतर सत्तेत दगाबाजी करत राष्ट्रवादी काँग्रेसनं उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं. त्यावेळी मराठा आरक्षणाचा विषय अक्षरशः बाजूला पडला होता. 2019 मधील जनतेचा कौल लक्षात घेत, बाळासाहेबांच्या विचारांवर चालणाऱ्यांनी एकत्रित येत भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. आता हळूच सोशल मीडियावर मराठा आरक्षणाचा विषय लावून धरला जातोय. कधी ओबीसी, कधी SC, कधी ST असे विविध विषय चर्चेला आणले जात आहेत. यामागील करता करविता कोण? हे तुम्हाला माहीत आहेच. आत्ताच विरोधकांना आरक्षणाची खाज कशी सुटली? याची जाणीव तुम्हाला व्हायला हवी. मी मराठा आरक्षणासाठी काम करत होतो, करणार आहे. समाजासाठी वेळ पडली तर सत्तेतून बाहेर येईल. हे सरकार मराठा आरक्षणाचा विषय नक्कीच मार्गी लावणार याची मी तुम्हाला खात्री देतो.", असं म्हणत त्यांनी मराठा आरक्षणाबाबत खात्री दिली आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांची वादग्रस्त वक्तव्यांची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. यापूर्वीही ते हाफकिनसंदर्भातील वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. काही दिवसांपूर्वी पुण्यातील ससून रुग्णालयात घडलेला प्रसंग एका वर्तमानपत्रात छापून आल्यानंतर त्यांची राज्यभर चर्चा सुरु आहे. ससून रुग्णालयात हाफकिन माणसाकडून औषधं घ्यायचा बंद करा असा आदेश दिला होता. त्यावेळी त्यांच्या पीएकडून त्यांना हाफकिन ही संस्था असल्याचं सांगण्यात आलं. त्यावेळी त्यांनी तिथून पळ काढला, अशी बातमी छापून आली. त्यावरुन सावंत यांना सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांची जीभ घसरली असून पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Girish Mahajan on Shiv Sena : आता शिवसेना भवनासाठी मारमाऱ्या होतील; मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य