Nepal Next PM: कोण आहेत सुशीला कार्की? नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान, BHU मध्ये शिक्षण
Nepal : नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनानंतर तेथील राजकीय स्थित्यंतरे बदलली असून सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या सुशीला कार्की नेमक्या आहेत तरी कोण? हे जाणून घेऊ.

Nepal Next PM काठमांडू: भारताच्या शेजारील देश असलेल्या नेपाळमध्ये (Nepal) Gen-Z आंदोलनानंतर तेथील राजकीय स्थित्यंतरे बदलली असून सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांना पंतप्रधानपदाची शपथ दिली. पौडेल यांनी नेपाळच्या तिन्ही प्रमुख राजकीय पक्षाच्या प्रमुखांना बोलावून प्रतिनिधी सभा बरखास्त करत असल्याचे सांगितले. तसेच, सुशीला कार्की ह्या अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतील, अशी घोषणाही त्यांनी केली होती. त्यानुसार, सुशीला कार्की यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून राष्ट्रपतीकडून त्यांचा शपथविधी संपन्न झाला आहे.
सोशल मीडियावरील बंदी निमित्त ठरल्यानंतर झालेल्या आंदोलनात (Agitaion) आंदोलकांनी आक्रमक भूमिका घेत पंतप्रधानांसह अनेक मंत्र्यांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, नेपाळचे माजी पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पळ काढला होता. त्यानंतर, नेपाळच्या पंतप्रधानपदावर कोण विराजमान होणार याची चर्चा जगभरात होती. आता, नेपाळच्या अंतरिम पंतप्रधानपदासाठी (Prime minister) सुशीला कार्की यांची निवड करण्यात आली आहे. नेपाळमधील जेन झी आंदोलनाचे नेते बालेन शाहा यांचे नाव पंतप्रधानपदासाठी आघाडीवर होते, पण सुशीला कार्की यांची वर्णी लागली आहे. दरम्यान, नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरलेल्या सुशीला कार्की नेमक्या आहेत तरी कोण? हे जाणून घेऊ.
कोण आहेत सुशीला कार्की? Who is Sushila Karki?
सुशीला कार्की (जन्म: 7 जून 1952, बिराटनगर, नेपाल)
त्या नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश (Chief Justice) होत्या. त्यांचे शिक्षण: बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) मधून राज्यशास्त्रात पदवी (1975), त्रिभुवन विद्यापीठातून कायद्यात पदवी (1978) आणि महेंद्र मोरंग कॅम्पस, बिराटनगरमधून दुसरी कायद्याची पदवी (1972). त्या सात भावंडांपैकी सर्वांत मोठ्या आहेत.
कारकीर्द :
- 1979 पासून वकिली सुरू केली.
- 2007 मध्ये वरिष्ठ वकील (Senior Advocate) झाल्या.
- 2008 मध्ये सर्वोच्च न्यायालयात अस्थायी न्यायाधीश म्हणून नेमणूक, २०१० मध्ये कायमस्वरूपी.
- 2015 ते 2017 पर्यंत मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत. त्यांच्या काळात त्यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध कठोर भूमिका घेतली, ज्यामुळे त्या लोकप्रिय झाल्या. मात्र, 2017 मध्ये नेपाळी काँग्रेस आणि CPN (माओइस्ट सेंटर) च्या खासदारांनी पक्षपाती असल्याचा आरोप करून त्यांच्याविरुद्ध महाभियोग मांडला, ज्यामुळे त्या तात्पुरत्या निलंबित झाल्या होत्या
- त्या भ्रष्टाचारविरोधी आणि निष्पक्ष म्हणून ओळखल्या जातात, विशेषतः युवा आंदोलकांमध्ये (Gen Z movement) प्रसिद्ध
नेपाळच्या इतिहासात पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. नेपाळमधील हिंसक भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला. आंदोलकांनी कार्की यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला आणि राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी १२ सप्टेंबर २०२५ रोजी त्यांची अंतरिम पंतप्रधान म्हणून नेमणूक केली.
सुशीला कार्की यांनी 12 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी शपथ घेतली. विविध स्रोतांनुसार शपथविधीचा वेळ नेपाळच्या स्थानिक वेळेनुसार रात्री 8.30 ते 9.15 वाजता (IST नुसार ८:०० ते ८:४५ वाजता) झाला. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी शपथ दिली. ही घटना नेपाळच्या इतिहासातील महत्त्वाची आहे, कारण त्या पहिल्या महिला आहेत ज्या सरकारचे नेतृत्व करणार आहेत. आंदोलनानंतर शांतता प्रस्थापित करणे आणि सहा महिन्यांत लोकसभा निवडणुका घेणे, ही आव्हाने त्यांच्यासमोर असतील
























