मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचं काम काम युध्दपातळीवर पूर्ण करा, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांचे निर्देश
Mumbai Goa Highway: मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या कॉक्रीटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश रविंद्र चव्हाण यांनी आज दिले.
Mumbai Goa Highway : मुंबई- गोवा महामार्गावरील पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर या 84 किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या कॉक्रीटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. महामार्गाच्या मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उददीष्टय आहे. महामार्गाचे काम 10 पॅकेजेसमध्ये सध्या सुरु आहे. त्यापैकी 5 पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहेत.तसेच मुंबई-गोवा महामार्ग चौपदीकरणाचे काम जलदगतीने पूर्ण करण्यासाठी सर्व उपाययोजना करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी उपस्थित अधिका-यांना यावेळी दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या संदर्भात आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींची बैठक पार पाडली. या बैठकीला शिक्षण मंत्री दिपक केसरकर, आमदार जयंत पाटील, आमदार भरत गोगोवले, आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर आदी आमदार उपस्थित होते. तर आमदार आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार प्रविण दरेकर, आमदार निरंजन डावखरे आदि लोकप्रतिनिधी ऑनलाईन उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी, तसेच सार्वजनिक बांधकाम विभागचे सचिव व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत रायगड जिल्ह्यातील कासू ते पनवेल या सुमारे ४२ कि.मीच्या महामार्गावरील एका लेनचे काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल. तसेच याच महामार्गावरील दुस-या लेनच्या रस्त्यावरील खड्डे लवकरच भरण्यात येतील. या रस्त्याचे पॅचवर्क तसेच आवश्यक कॉंक्रिटीकरणाचे काम लवकर करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणांतर्गत जी काही रखडलेली कामे शिल्लक आहेत. ते लवकर पूर्ण करण्याच्यादृष्टीने युध्दपातळीवर काम करण्यात येतील. नॅशनल हायवे ऑथोरिटी व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिका-यांमध्ये योग्य समन्वयाचा राखण्याच्या सूचना यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. तसेच जे काम अपूर्ण राहिले आहे, त्या सर्व कामाची प्रगती पाहण्याच्यादृष्टीने या कामाचे शूटिंग ड्रोनच्या साहाय्याने करण्याचे निर्देशही मंत्री चव्हाण यांनी यावेळी दिले.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणामध्ये ज्या ठिकाणी ब्लॅकस्पॉट्स आहेत. ते काम पावासाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. तसेच रस्त्याच्या कॉक्रीटीकरणाचे शिल्लक काम हे नियमित कंत्राटदारांकडून करण्यात येईल. पण अन्य छोटी-छोटी कामे ही अन्य ठेकेदारांकडून पूर्ण करुन घेण्यात येतील. या महामार्गावर प्रवास करणा-यांना त्रास होऊ नये व त्यांचा प्रवास सुखकर होईल यादृष्टीने काम करण्याच्या सुचनाही यावेळी मंत्री चव्हाण यांनी दिल्या. पऱशुराम घाटाचे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा घाट किमान सात दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागेल. त्यामुळे या घाटातील वाहतूकीसाठी पर्यायी मार्ग असलेला चेळणीचा पर्यायी मार्ग पावसाळ्यापूर्वी सुसज्ज करण्यात येईल.तसेच ज्या जिल्ह्यांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया प्रलंबित आहे, ती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश जिल्ह्याधिका-यांना देण्यात येतील असेही मंत्री चव्हाण यांनी स्पष्ट केले.