रासायनिक कारखान्यांचे कृत्य कामगारांच्या जीवावर; चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू
Navi Mumbai Updates: रासायनिक कारखान्यांचे कृत्य कामगारांच्या जीवावर बेततंय. चेंबर साफ करताना गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर एका कामगाराची सध्या मृत्यूशी झुंज सुरु आहे.

Navi Mumbai Updates: रासायनिक कारखान्यांचे कृत्य कामगारांच्या जीवावर बेतलं आहे. चेंबर साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. नवी मुंबई (Navi Mumbai News) एमआयडीसीतील एका ठिकाणी गटार साफ करत असताना अचानक त्यातील गाळातून उग्र दर्प येऊ लागला. यामुळे दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला, तर तिसरा कामगार सध्या मृत्यूशी झुंज देत आहे. एमआयडीसीतील रासायनिक कारखाने अनेकदा रात्रीच्या अंधारात प्रक्रिया न करता पाणी सोडतात. या रसायन युक्त पाण्यामुळेच या कामगारांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप होत आहे.
रबाळे एमआयडीसीमधील गटारातून पाण्याचा निचरा योग्य रित्या होत नसल्यानं या गटारांची साफसफाई मोहीम हाती घेण्यात आली होती. गटार साफ करण्यासाठी चार कामगार गेले होते. गटारामध्ये रसायनीक गाळ मोठ्या प्रामाणात साचून राहिल्यानं तीन कामगार यासाठी गाळात उतरले होते. साफसफाईचे काम बिटकॉन ऑफ इंडिया या कंपनीला देण्यात आले होते. रबाळे एमआयडीसीमधील भूखंड क्रमांक डब्ल्यू 310 येथे प्रोफॅब इंजिनियरिंग प्रा.लि. कंपनीसमोरील गटार चेंबर उघडून काम सुरु करण्यात आलं होतं.
यावेळी गटारात उतरून काम करणाऱ्या विजय झाडखंड आणि संदीप हंबे या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर वसंत झाडखंड यांच्यावर उपचार सुरू आहेत. एमआयडीसीतील भागात गटार तुंबले होते. त्यामुळे त्याचा उपसा करण्यासाठी विजय झाडखंड, संदीप हंबे आणि विजय हॉदसा हे तिघे आत उतरले होते. गाळ काढताना अचानक त्यातून उग्र दर्प येणं सुरु झालं आहे. काही वेळातच हा दर्प परिसरातही पसरला. त्यात पर्यवेक्षक म्हणून काम करणारा दत्तात्रय गिरिधारी हा बाहेर उभा होता. त्यानं कामगारांना आवाज दिला, मात्र प्रतिसाद न मिळाल्यानं आसपाच्या लोकांच्या मदतीनं त्यानं तिघांना बाहेर काढलं. तिनही कामगार बेशुद्ध अवस्थेत होते. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल केलं असता त्यातील विजय झाडखंड आणि संदीप हंबे यांना मृत घोषित करण्यात आलं. वसंत झाडखंड यांच्यावर अजूनही उपचार सुरु आहेत. या प्रकरणात पर्यवेक्षक दत्तात्रय गिरिधारी याला अटक करण्यात आली असून 8 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
निष्काळजीपणा भोवला
एमआयडीसीतील गटार साफ करताना रासायनिक घटकांचा सामना होऊ शकतो, हे लक्षात घेता तशी सुरक्षा कामगारांना पुरवणं क्रमप्राप्त होतं. मात्र त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आलं. तसेच रात्रीच्या वेळेस अनेकदा उग्र वास येत असलेल्या तक्रारीकडे रासायनिक कारखानदार आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या दुर्लक्षामुळे दोघांचा जीव गेला, असा आरोप स्थानिक रहिवासी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
