Navi Mumbai News : आमदार गणेश नाईक यांच्याविरोधातील बलात्कार आणि धमकीची तक्रार महिलेकडून मागे; मंदा म्हात्रे, विजय चौगुलेंवर गंभीर आरोप
गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. यासोबतच आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी हे सर्व करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे.
Navi Mumbai News : नवी मुंबईतील आमदार गणेश नाईक (Ganesh Naik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेश नाईक यांच्याविरोधात बलात्कार आणि धमकी देण्याचा आरोप करणाऱ्या महिलेने तक्रार मागे घेतली आहे. मात्र यासोबतच भाजप आमदार मंदा म्हात्रे (Manda Mhatre) आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले (Vijay Chaugule) यांनी हे सर्व करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप संबंधित महिलेने केला आहे. दीपा चौहान या महिलेने आमदार गणेश नाईक यांच्याविरोधात नेरुळ पोलीस ठाण्यात बलात्कार आणि बेलापूर पोलीस ठाण्यात धमकी दिल्याप्रकरणी तक्रार दिली होती. या महिलेच्या तक्रारीवरुनच आमदार गणेश नाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मंदा म्हात्रे आणि विजय चौगुलेंकडून माझा राजकारणासाठी वापर : दीपा चौहान
दरम्यान दीपा चौहान या महिलेने एका पत्रात मंदा म्हात्रे आणि विजय चौगुले यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. "हे सर्व करण्यास भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी प्रवृत्त केल्याचं दीपा चौहानने पत्रात नमूद केलं आहे. "शिवसेनेतून निवडणुकीसाठी संधी आणि आणि जीवन उदरनिर्वाहसाठी पैसे देण्याचे आश्वासन दिलं होतं. परंतु उद्दिष्ट पूर्ण झाल्यावर मला टाळू लागले. विजय चौगुले आणि मंदा म्हात्रे यांनी माझा राजकारणासाठी वापर करुन घेतला," असा आरोप दीपा चौहान यांनी लावला. या पत्रामुळे जीवितास धोका असून काय झाल्यास आमदार मंदा म्हात्रे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांना दोषी धरण्यात यावं, असं पत्रात स्पष्ट केलं आहे.
काय आहे प्रकरण?
नवी मुंबईतील भाजपचे आमदार गणेश नाईक यांच्यावर त्यांच्या परिचित महिलेने बलात्कार आणि धमकावल्याची तक्रार दिली होती. "गणेश नाईक हे आपल्यासोबत मागील गेल्या 27 वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. त्यांच्यासोबतच्या संबंधातून आपल्याला एक 15 वर्षाचा मुलगा आहे. नाईक यांनी आपल्या मुलाला वडील म्हणून त्यांचं नाव द्यावं, अशी मागणी केली असता नाईक यांनी त्यास नकार दिला," असं सांगत महिलेने गणेश नाईक यांच्या राजकीय विरोधकांच्या मदतीने थेट पोलिस ठाणे गाठत तक्रार दिली होती. गणेश नाईक यांनी आपल्याला रिव्हॉल्व्हर दाखवून धमकावलं तसेच सतत बलात्कार केल्याचा आरोप केला होता. या तक्रारीवरून नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी बेलापूर आणि नेरूळ इथं नाईक यांच्यावर दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले होते. आपल्याला न्याय मिळावा म्हणून तक्रारदार महिलेनं महाराष्ट्र महिला आयोगाकडेही तक्रारही केली.
या प्रकरणी अटक होण्याच्या भीतीपोटी नाईक यांनी ठाणे सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावत दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे नाईक यांनी तातडीने मुंबई उच्च न्यायलायात धाव घेत अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी करत अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. हायकोर्टानेच त्यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. तक्रारदार महिला आणि गणेश नाईक हे 1995 ते 2017 पर्यंत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. त्यामुळे प्रथमदर्शनी यास बलात्कार म्हणताच येणार नाही, असं निरीक्षण नोंदवत हायकोर्टाने गणेश नाईक यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला होता.