Navi Mumbai Metro : नवी मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो काहीच दिवसांत येणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होण्याची शक्यता
Navi Mumbai Metro : 13, 14 किंवा 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत येणार असून बहुप्रतीक्षीत नवी मुंबईच्या मेट्रोचे उद्घाटन होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई : बहुप्रतीक्षीत असलेली नवी मुंबईची मेट्रो (Metro) सेवा ही लवकरच प्रवाश्यांच्या सेवेत येणार असल्याचं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या मेट्रोचं उद्घाटन होणार असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी हे मुंबई (Mumbai) दौऱ्यावर येणार आहेत. त्यावेळी ते नवी मुंबईच्या मेट्रोचं उद्घाटन करतील अशी माहिती सध्या देण्यात येत आहे.
13, 14 किंवा 17 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत येण्याची शक्यता आहे. तर नवी मुंबईच्या मेट्रोच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी शिर्डीला देखील जाण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. काहीच दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं उद्घाटन केलं होतं. त्यानंतर पुणेकरांच्या सेवेमध्ये ही मेट्रो आली. आता त्याच मेट्रोची प्रतीक्षा ही नवी मुंबईकरांना लागून राहिली आहे. या मेट्रोमुळे नवी मुंबईकरांचा प्रवास देखील सुखकर आणि जलद होण्यास मदत होईल.
नवी मुंबईकरांना मेट्रोची प्रतीक्षा
मागील बारा वर्षांपासून नवी मुंबईकर हे मेट्रोच्या प्रतीक्षेत आहेत. 1 मे 2011 रोजी नवी मुंबई मेट्रोचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले होते. तेव्हापासून या मेट्रोचा तिढा काही केल्या सुटत नव्हता. परंतु सिडकोच्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र. 1 वरील सेंट्रल पार्क ते बेलापूर स्थानक या स्थानकांदरम्यान प्रवासी वाहतूक सुरू करण्याकरिता मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी परवानगी दिली. त्यामुळे आता लवकरच बेलापूर ते पेंधर या संपूर्ण मार्ग क्र. 1 वर प्रवासी वाहतूक सुरू होणार आहे. तर याच मार्गिकेचं उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार असल्याचं सांगण्यात येतयं.
कोणत्या स्थानकांचा समावेश?
नवी मुंबईच्या या मेट्रो 1 मार्गिकेमध्ये 11 स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये सीबीडी-बेलापूर, सेक्टर 7, सिडको सायन्स पार्क, उत्सव चौक, खारघर सेक्टर 11, खारघर, सेक्टर 14, खारघर सेंट्रल पार्क, पेठपाडा, खारघर सेक्टर 34, पाचनंद आणि पेंधर-तळोजा अशी स्थानके आहेत. यामुळे नवी मुंबईकरांच्या प्रवासाची चिंता आता मिटणार असल्याचं सांगण्यात येतय. मेट्रोची ही मार्गिका संपूर्ण नवी मुंबईच्या अंतर्गत भागातून जाते. त्यामुळे या मार्गाचा खारघर नोडसह कळंबोली, रोडपाली आणि तळोजा परिसराला मोठा फायदा होणार आहे.
कोणाला होणार मेट्रोचा सर्वाधिक फायदा?
तळोजा ही मोठी औद्योगिक वसाहत आहे. शिवाय कळंबोलीचे स्टील मार्केट महामुंबईतील सर्वात मोठे स्टील मार्केट आहे. येथे रोज हजारो चाकरमानी ये-जा करत असतात. या चाकरमान्यांसाठी एनएमएमटीची बससेवा आहे. परंतु, ही बससेवा अतिशय अपुरी आहे. ही मेट्रो सुरू झाली तर या प्रवाशांसह बेलापूर, तळोजा परिसरातील विद्यार्थी आणि स्थानिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे आता काहीच दिवसांत नवी मुंबईची मेट्रो ही प्रवाश्यांच्या सेवेमध्ये येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.